T20 World Cup, India vs Pakistan: आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली आहे... १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला यूएईत सुरूवात होईल, परंतु सर्वांना वेध लागलेत ते २४ ऑक्टोबरचे... दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी आजी-माजी खेळाडू दावे करत सुटले आहेत आणि टीम इंडियापेक्षा ते किती वरचढ आहेत, असाच दावा करत आहेत. त्यात आणखी एका माजी अष्टपैलू खेळाडूची भर पडली आहे.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक यानं मोठा दावा केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सर्व संबंध तुटलेले आहेत आणि फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळेच २४ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यात अब्दुल रझाकनं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची कुवत नाही, त्यामुळेच ते आमच्याविरुद्ध खेळत नाहीत, असा दावा केला आहे.
''टीम इंडिया पाकिस्तानशी स्पर्धाच करू शकत नाही. पाकिस्तान संघाकडे टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात सामना न होणं हे क्रिकेटसाठी दुर्दैवी आहे. या सामन्यातून खेळाडूंना प्रचंड दडपणाचा सामना कसा करावा हे शिकायला मिळतं. पाकिस्तानात प्रतिभावान खेळाडू आहेत आणि भारताकडे नाहीत,''असे रझाक म्हणाल.
अझाकनं त्याचं विधान सिद्ध करण्यासाठी काही उदाहरणंही दिली. त्याच्या मते, भारताने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह असे अनेक खेळाडू घडवले, परंतु तरीही त्यांच्याकडे पाकिस्तानचा सामना करण्याची कुवत असलेले खेळाडू नाहीत. पाकिस्तानात भारतापेक्षा चांगले खेळाडू घडले आहेत,'असेही तो म्हणाला.
प्रचंड दडपण कसे हाताळायचे, यातही पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय तोड देऊ शकत नाहीत, असे तो म्हणाला. दरम्यान, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारतानं शेजाऱ्यांना १४वेळा पराभूत केले आहे. त्याउलट पाकिस्ताननं २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसह तीनच वेळा विजय मिळवला आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं शेजाऱ्यांना लोळवून जेतेपद जिंकले होते.
तो पुढे म्हणतो,''भारतीय संघ चांगला आहे, त्यापलिकडे मी काही बोलत नाही. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत, परंतु पोटेंशिअल नुसार पाकिस्तानी खेळाडू वरचढ आहेत. आमच्याकडे इम्रान खान, त्यांच्याकडे कपिल देव होते. पण, त्यांची तुलना केल्यास इम्रान खान वरचढ ठरतील. त्यानंतर आमच्याकडे वासीम अक्रम होते, त्यांच्या तोडीचा एकही खेळाडू भारताकडे नव्हता.''
''आमच्याकडे जावेद मियाँदाद आणि त्यांच्याकडे गावस्कर. त्यांच्यातही तुलना होऊ शकत नाही. त्यानंतर आमच्याकडे इंझमाम, युसूफ, युनिस, शाहिद आफ्रिदी आणि त्यांच्याकडे द्रविड, सेहवाग आहेत. तुम्ही एकंदर पाहाल तर पाकिस्ताननं नेहमीच चांगले खेळाडू घडवले आहेत. त्यामुळेच भारतीय संघ आमच्याविरुद्ध खेळत नाही,''असेही रझाक म्हणाला.