ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा गोलंदाज अर्शदीप सिंग यानं उत्तम कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही अर्शदीपनं केलेल्या गोलंदाजीचं कौतुक करण्यात आलं. 23 वर्षीय अर्शदीपनं टी 20 विश्वचषकातील चार सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहे. यात पाकिस्तानविरुद्ध 32 धावांवर तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मी काय सातत्य ठेवण्यावर लक्ष देत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना तुम्ही सामान्य गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नसता. चेंडू नवा असो किंवा जुना मला चांगलीच कामगिरी करायची आहे. गरजेनुसार मला विकेट्सही घ्यायच्या आहेत आणि आवश्यक असेल तिथे धावसंख्येवर अंकुशही लावायचाय, असं अर्शदीप स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला.
पारस म्हांब्रे यांनी (भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक) माझ्या गोलंदाजीसाठी रनअपवर काम केलंय. मी जर सरळ रनअप घेतला तर लाईनमध्ये सातत्य राहिल. ऑस्ट्रेलियाच्या पिचवर खराब लाईन लेंथसह तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही, असंही त्यानं स्पष्ट केलं.
यासाठीच मी सरळ रेषेत रनअप घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे परिणामही मला दिसून येत आहेत. मी यापेक्षाही चांगली कामगिरी करेन अशी अपेक्षा करतोय, असं तो म्हणाला. अर्शदीपला यादरम्यान तू लेंथ वर काय काम करत आहेस असाही सवाल करण्यात आला. आम्ही जवळपास एक आठवडा आधी पर्थ मध्ये पोहोचलो आणि आपल्या लेंथ वर काम सुरू केल्याचं त्याने सांगितलं.
सरावादरम्यान पिचवरील चेंडूची उसळी पाहत योग्य लेंथ ओळखण्यात आम्ही यशस्वी झालो. आम्ही योग्य तयारीनिशी उत्तम कामगिरी केली आहे, असं अर्शदीपनं स्पष्ट केलं. अर्शदीपनं यावेळी टी 20 विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानविरोधात तीन विकेट्सही घेतल्या होत्या.