T20 World Cup: आफ्रिदीविरोधात कसा असावा गेम प्लॅन? गौतम गंभीरनं टीम इंडियाला दिला खास सल्ला

T20 World Cup: वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत खेळणार आहे.

T20 विश्वचषक 2022 ला 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. या मेगा टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, अशा परिस्थितीत पराभवाचा बदला घेणे हे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. T20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा आक्रमकपणे सामना केला पाहिजे आणि त्याच्यासमोर विकेट वाचवण्याचा विचार करू नये, असे गंभीर म्हणाला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडलेल्या आफ्रिदीकडे आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय फलंदाजांसमोर खडतर आव्हान म्हणून पाहिले जात आहे.

“शाहीन आफ्रिरीच्या समोर विकेट वाचवण्याचा विचार करू नको. त्याच्या विरोधात धावा बनवण्याचा विचार करा. जेव्हा तुम्ही विकेट वाचवण्याचा विचार कराल, तेव्हा सर्वकाही छोटं होईल. बॅकलिफ्ट, फुटवर्क सर्व… टी 20 क्रिकेटमध्ये या विचासोबत खेळलं जाऊ शकत नाही,” असं गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या गेमप्लॅन या कार्यक्रमात चर्चेदरम्यान म्हटले.

“तो घातक गोलंदाज आहे हे मला माहित आहे. परंतु भारतीय फलंदाजांना त्याच्या विरोधात धावा कराव्याच लागतील. भारताकडे पहिले तीन चार असे फलंदाज आहेत जे त्याच्याविरोधात धावा करू शकतात,” असेही तो म्हणाला.

तर दुसरीकडे भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनंदेखील भारततीय खेळाडूंना सल्ला दिला. बाबर आझम किंवा मोहम्मद रिझवान यांना सेट होण्याची संधी देऊ नका. ते पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करतात. बाबर आझमला वेळ लागतो आणि दोघांचा खेळ समजून गोलंदाजी करावी लागेल, असे तो म्हणाला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी शाहीन शाह आफ्रिदीच्या फिटनेसबाबत माहिती दिली. तो आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 90 टक्के तयार आहे, परंतु त्याची उपलब्धता ऑस्ट्रेलियातील दोन सराव सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीवर अवलंबून असेल. 22 वर्षीय आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर शनिवारी ऑस्ट्रेलियात राष्ट्रीय संघात सामील होणार आहे. तो अनुक्रमे 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यांमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल.

“मी त्याच्याशी बोललो आणि आम्ही डॉक्टरांच्या संपर्कात आहोत. आम्हाला मिळालेल्या फीडबॅकनुसार तो 90 टक्के फीट आहे. गुडघ्याची दुखापत अतिशय नाजूक असते आणि त्याला काही त्रास होतोय का हे सराव सामन्यात पाहावं लागेल. त्याला सांगितले की तो तयार आहे आणि मलाही वाटते की आम्हीही तयार आहोत,” असे ते म्हणाले.