विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS: सुनील गावसकर नेहमीच आपल्या स्पष्ट विधानांसाठी ओळखले जातात

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत पराभव झाला. पहिल्या सामन्यात पावसाने भारतीय संघाचा घात केला आणि २६ षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली.

दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने दमदार ७३ धावा केल्या. पण तरीही भारताला पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहलीला मात्र दोन्ही सामन्यात शून्यावर माघारी परतावे लागल्याने चाहते नाराज झाले.

विराट कोहली ज्या प्रकारे दोन्ही डावात बाद झाला, त्यावरून त्याच्यावर काहींनी टीका केली. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही विराटच्या अपयशावर अतिशय रोखठोक मत मांडले.

"अडलेडच्या मैदानावर विराटने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीयांसह ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्याही त्याच्याकडून अपेक्षा होत्या, पण त्याला चांगले खेळता आले नाही."

"अडलेडमध्ये तो फलंदाजीला आला तेव्हा सर्वांनी आनंदाने त्याचे स्वागत केले. तो बाद झाला त्यावेळीही लोकांनी त्याला धीर दिला आणि क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी टाळ्या वाजवल्या."

"विराट कोहलीच्या बाबतीत पहिल्या दोन सामन्यात जे घडलं त्यावर फारसा विचार करत बसू नका. विराटमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. सिडनीमध्ये तो मोठी खेळी खेळू शकतो."

"विराट कोहलीच्या १४ हजार धावा, ५२ वनडे शतके, ३२ टेस्ट शतके आहेत. त्याने आतापर्यंत हजारो धावा केल्यात. त्यामुळे दोन डावांत अपयशी ठरण्याची त्याला परवानगी आहे," असे ते म्हणाले.