Sunil Gavaskar Rohit Sharma: "रोहित शर्मा म्हणजे सापाचं डोकं..."; सुनील गावसकरांनी केली अजब तुलना.. नक्की काय म्हणाले वाचा

टी२० विश्वचषक काही दिवसांवर असताना गावसकरांचे हे विधान

Sunil Gavaskar Rohit Sharma: भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी२० मालिका जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा टीम इंडियाचा घरच्या मैदानावर सलग १०वा टी२० मालिका विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८६ धावा केल्या. टीम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांनी अर्धशतके ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना आणि मालिका जिंकली.

पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केले. पावसामुळे ८ षटकांचा झालेल्या सामन्यात भारताने कर्णधार रोहित शर्माच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. त्याने २० षटकांत नाबाद ४६ धावा करत संघाला विजयी लय मिळवून दिली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार आणि विराटने संघाला मोठा विजय मिळवून दिला. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला घरच्या मैदानावर सलग १०वा टी२० मालिका विजय मिळवता आला.

भारतीय संघ आता उद्यापासून दक्षिण आफ्रिकेशी ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. अशा वेळी रोहित शर्मा आणि टीम यांना सर्वोत्तम कामगिरी करणे अत्यावश्यक आहे. पण याच दरम्यान, रोहित शर्माबद्दल बोलताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्याची तुलना थेट सापाच्या तोंडाशी केली आहे. नक्की असं काय म्हणाले गावसकर.. जाणून घेऊया

"जेव्हा भारताकडे सातव्या-आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी उपलब्ध असते त्यावेळी रोहित शर्माने फटकेबाजी करतच खेळणे अपेक्षित आहे. आम्हालाही रोहित शर्माची दीर्घकाळ चालणारी बॅटिंग पाहायला आवडते यात वादच नाही. जर तो १०-१२ षटके खेळला तर तो संघाला तेवढ्या वेळात १२०च्या आसपास धावसंख्या सहज गाठून देऊ शकतो", असे गावसकर म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, "भारताला जर धुवाँधार सलामी फलंदाजीची गरज असेल तर तसं रोहित करू शकतो. भारताकडे ५,६,७ क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये सामना पलटवण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध हार्दिक पांड्या शेवटच्या टप्प्यात कसा खेळला ते आपण साऱ्यांनीच पाहिले आहे. त्यामुळे तुमच्याकडे असे फलंदाज असताना तुम्ही थोडी जोखीम घेऊन खेळलात तरी हरकत नाही" याच पुढचे मत मांडताना गावसकरांनी रोहित आणि सापाच्या तोंडाचे उदाहरण दिले.

"कर्णधार हा सलामीवीर असतो तेव्हा गोलंदाज त्याचा आत्मविश्वास खच्चीकरण करण्यासाठी त्याच्यावर वार करत असतो. रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार आहे. तो सलामीवीर आहे. त्यामुळे विरोधी संघाने त्याला बाद करणे हा प्रतिस्पर्ध्यांसाठी खूप मोठा फायद्याचा विषय नक्कीच ठरतो. रोहित शर्माला बाद करणे म्हणजे प्रतिस्पर्धी संघासाठी सापाच्या तोंडाच्या भागाचा ताबा मिळवण्यासारखे आहे. त्याचा ताबा मिळाला की संघ ताब्यात येणार हे त्यांना माहिती आहे", अशा शब्दांत गावसकरांनी आपले मत मांडले.