Sunil Gavaskar on Rohit Sharma Test Captaincy, IND vs SL 1st Test: भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. अवघ्या तीन दिवसात पहिली कसोटी भारताने आपल्या नावे केली. कसोटी कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यावर पहिल्याच कसोटी रोहितच्या टीम इंडियाला मोठा विजय मिळाला.
भारतीय संघाने पहिल्या डावात ५७४ धावांची महाकाय धावसंख्या उभारली. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने पहिल्या डावात १७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १७५ धावा कुटल्या. तसेच श्रीलंकेच्या दोन्ही डावात मिळून ९ बळीदेखील टिपले.
जाडेजाच्या आधी रिषभ पंतने देखील दमदार खेळी केली. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. पंतने ९७ चेंडूत ९६ धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
अष्टपैलू आर अश्विननेदेखील शानदार कामगिरी केली. त्याने अर्धशतकी खेळी (६१) केली. तसेच दोन्ही डावात मिळून ६ गडीही बाद केले.
भारतीय माजी कर्णधार विराट कोहलीचा हा शंभरावा सामना होता. शतकी कसोटीत विराट शतक ठोकेल अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. पण तो ४५ धावांवर बाद झाला.
नवा कर्णधार रोहित शर्मासाठी ही कसोटी खास ठरली. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटीत तो यशस्वी ठरला. त्याने वैयक्तिक स्तरावर मोठी खेळी केली नाही. पण संघाचं नेतृत्व अतिशय योग्य पद्धतीने केलं.
रोहितच्या नेतृत्वकौशल्याचं माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कौतुक केलं. 'तुम्ही जेव्हा तीन दिवसात सामना जिंकता तेव्हा तुमचा संघ किती भक्कम आहेत ते स्पष्ट होतं. कर्णधार म्हणून रोहितचं पदार्पण अप्रितम होतं. गोलंदाजीतील बदल आणि फिल्डर्सच्या जागा यात रोहितने अप्रतिम कामगिरी केली', असं गावसकर म्हणाले.
रोहितच्या टेस्ट कॅप्टन्सीला तुम्ही १० पैकी किती मार्क्स द्याल? असं सुनील गावसकर यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी रोहितच्या नेतृत्वकौशल्याला १० पैकी ९.५ गुण दिले. एका विशेष कारणासाठी त्यांनी अर्धा गुण कापला.
अर्धा मार्क कुठे कापला? - 'रोहितने गोलंदाजीत उत्तम बदल केले. पण पहिल्या डावात त्याने रविंद्र जाडेजाला थोडं उशिरा गोलंदाजीसाठी आणलं. त्यामुळे मी त्याला १० पैकी ९.५ मार्क्स देईन', असं गावसकर यांनी स्पष्ट केलं.