पंतला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळवा, मी सिलेक्टर असतो तर नक्कीच निवड केली असती - गावस्कर

T20 World Cup 2024: जून महिन्यात ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे.

मागील वर्षी वन डे विश्वचषक पार पडल्यानंतर क्रिकेट विश्व आता ट्वेंटी-२० क्रिकेटकडे वळत आहे. आगामी काळात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक होणार आहे. सहा महिन्यांनी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

आगामी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने सर्वच संघ ट्वेंटी-२० क्रिकेट खेळत आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी एक अजब विधान केले आहे.

ट्वेंटी-२० विश्वचषकात रिषभ पंतला संधी मिळायला हवी यावर गावस्कर ठाम आहेत. विश्वचषकासाठी भारतीय संघात यष्टिरक्षकाच्या जागेसाठी तीन खेळाडूंमध्ये चुरशीची लढत होईल, असा विश्वास लिटिल मास्टर यांनी व्यक्त केला आहे.

रिषभ पंत एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतच्या गाडीचा अपघात झाला ज्यात भारतीय खेळाडू गंभीर जखमी झाला. पण, पंत ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा हिस्सा असायला हवा, अशी इच्छा गावस्करांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, मी लोकेश राहुलकडे यष्टीरक्षक फलंदाज म्हणूनही पाहत आहे. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की पंत जर त्याच्या एका पायाने तंदुरुस्त असेल, तो एका पायावर उभा राहू शकत असेल तर त्याने विश्वचषक खेळावा. कारण तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये गेम चेंजर आहे.

तसेच मी निवडकर्ता असतो तर पंतच्या नावाला प्राधान्य दिले असते आणि त्यातून संतुलन देखील निर्माण होईल. जर रिषभ पंत संघाचा भाग असेल तर तो सलामीवीर किंवा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पर्याय असेल, असेही गावस्करांनी सांगितले.

सुनिल गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, ट्वेंटी-२० विश्वचषक संघ निवडीसाठी भारतीय खेळाडूंमध्ये चांगलीच घोडदौड सुरू आहे. इशान किशन, लोकेश राहुल आणि रिषभ पंत हे तिन्ही खेळाडू यष्टीरक्षक फलंदाज म्हणून चांगले आहेत.

जितेश शर्मा देखील एक चांगला खेळाडू आहे, तो खूप चांगला फिनिशर आणि स्ट्रायकर आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक बऱ्याचदा खूप पाठी उभे असतात. त्यामुळे यष्टिरक्षणात तेवढे कौशल्य नसले तरी फलंदाजी आणि फॉर्म असेल तर तुम्ही संघात पुनरागमन करू शकता.

क्रिकेटच्या या लहान फॉरमॅटमध्ये यष्टीरक्षक स्टंपच्या जवळ असणे फार दुर्मिळ असते. मर्यादीत षटके टाकायची असल्याने गोलंदाज देखील जोर लावतात, त्यामुळे यष्टीरक्षक बऱ्याचदा स्टंम्पपासून दूर असतो.