वानखेडे स्टेडियमवर कडक बंदोबस्त; आक्षेपार्ह बॅनर, झेंडे पोर्स्टर्संना बंदी

भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज गुरुवारी भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जात आहे. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा आहे.

भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज गुरुवारी भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जात आहे. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा आहे.

कोहलीने या सामन्यात शतक झळकावल्यास तो सचिन तेंडुलकरच्या ४९ व्या एकदिवसीय शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करेल. १२ वर्षांपूर्वी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये वानखेडे स्टेडियमवरच श्रीलंकेला नमवून दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला होता.

त्यामुळे, आज पुन्हा एकदा विश्वचषकातील जुन्या आठवणी जागवल्या जाणार असून प्रेक्षकांचाही उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच मुंबईतील वानखेडे मैदानाकडे प्रेक्षकांनी धाव घेतल्याचं दिसत आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं असताना मुंबईतील सामन्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

वानखेडे स्टेडियवरील या सामन्याचं तिकीट खरेदी केलेल्या प्रेक्षकांसाठी पोलिसांनी काही नियम व अटी लागू केल्या आहेत. ते नियम पाळण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडेंनी केले आहे.

मैदानावर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह बॅनर झळकवण्यास बंदी असून गेटवरच पोलिसांकडून याची तपासणी होणार आहे. त्यामुळे, सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

दुपारी २ च्या सामन्यासाठी सकाळी ११.३० वाजल्यापासूनच प्रेक्षकांना मैदानावर सोडण्यात येणार आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये, बॅग, पॉवर बँक, पाणी बॉटल, कॉईन (नाणी), ज्वलनशील पदार्थ, काडीपेटी, तंबाखूजन्य पदार्थ (सिगारेट, तंबाखू, गुटखा) इत्यादी पदार्थांना बंदी घालण्यात आली आहे.

तसेच, आक्षेपार्ह बॅनर, झेंडे, पॉम्प्लेट नेण्यासही स्टेडियममध्ये बंदी घालण्यात आली आहे. तर, साहित्य ठेवण्यासाठी देखील कुठलीही व्यवस्था स्टेडियमबाहेर करण्यात आली नाही.

प्रेक्षकांसाठी तिकीटामागे महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचना प्रेक्षकांना वाचून घ्याव्यात, असे आवाहन प्रवीण मुंडें, पोलीस उपायुक्त, मुंबई झोन १ यांनी केले. तसेच, पोलिसांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रेक्षकांनी खासगी गाड्या आणण्याचे टाळावे, कारण, पार्किंगची कुठलीही सुविधा स्टेडियम परिसरात नाही. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि लोकल ट्रेनने येणाऱ्या प्रेक्षकांनी चर्चगेट आणि मरीन लाईव्ह स्टेशनवर उतरावे, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.