इंडियन प्रीमिअर लीगच्या १५वे पर्व २६ मार्च ते २९ मे या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. आयपीएल २०२२चे साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. ५५ सामने वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात येतील, तर पुण्याच्या स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत.
लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रँचायझी दाखल झाल्यामुळे १० संघांमध्ये यंदाची आयपीएल होणार आहे. १० संघांची प्रत्येकी पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम व डी वाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी २०, तर ब्रेबॉर्न स्टेडियम व पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर प्रत्येकी १५ सामने खेळवण्यात येतील.
१० संघ साखळी फेरीत प्रत्येकी १४ सामने खेळतील. त्यापैकी ७ होम व ७ अवे असा फॉरमॅट असेल. साखळी फेरीत एकूण ७० सामने होतील आणि त्यानंतर ४ प्ले ऑफचे सामने. प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि चार संघांशी प्रत्येकी एक असे सामने खेळतील.
ग्रुप अ - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स; ग्रुप ब - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स
आयपीएलच्या यंदाच्या पर्वात १० संघांचा समावेश असल्यामुळे फॉरमॅटमध्येही बराच बदल पाहायला मिळतोय, पण BCCIने मागील पर्वात तयार केलेले नियम यंदाही कायम आहेत...
प्रत्येक संघाने २० षटकं ही ९० मिनिटांत पूर्ण करायलाच हवी ( ८५ मिनिटे षटकांसाठी अन् ५ मिनिटे टाईम आऊट). आयपीएलच्या सामन्यांची वेळ अर्धातास आधी सरकवूनही लढत संपायला उशीर होत असल्याने हा नियम करण्यात आला. एका तासात १४.११ षटकं फेकली गेली पाहिजे.
आयपीएल संघाचा कर्णधाराकडून या नियमाचे पहिल्यांदा उल्लंघन झाल्यास १२ लाख, दुसऱ्यांदा २४ लाखांचा दंड वसूल केला जाईल. त्यानंतर तिसऱ्या चूकीसाठी ३० लाखांचा दंड व एका सामन्याची बंदीची कारवाई होईल. त्यानंतर दुसऱ्या चुकीनंतर प्रत्येकी खेळाडूकडून ६ लाख किंवा मॅच फीमधील २५ टक्के रक्कम ( जी कमी असेल ती) दंड म्हणून वसूल केली जाईल. तरीही न सुधारल्यास १२ लाख किंवा मॅच फीमधील ५० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल.
भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेत सॉफ्ट सिग्नलचा निर्णय वादात अडकला होता आणि त्यामुळे आयपीएलने त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या अम्पायरवर ती जबाबदारी सोपवली गेली. त्यामुळे झेल अचूक टिपलाय की नाही, एखाद्या खेळाडूने जाणीवपूर्वक क्षेत्ररक्षणात अडथळा आणलाय का, याची पाहणी तिसरा अम्पायर करेल.
सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर तासाभरात खेळवली गेली पाहिजे. आयपीएल २०२०मध्ये काही सामने डबल सुपर ओव्हरपर्यंत गेले आणि त्यामुळे वेळही लांबली. त्यामुळे जर या तासाभरात विजेता न ठरल्यास दोन्ही संघांनी प्रत्येकी १ गुण देण्यात येईल.
आयपीएल २०२०मध्ये मैदानावरील अम्पायरने शॉर्ट रनचा निर्णय दिला अन् पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला. त्यावरून बराच वादही झाला. त्यामुळे असे वाद टाळण्यासाठी आता शॉर्ट रनचा निर्णय तिसऱ्या अम्पायरकडे सोपवण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये जेव्हा कुठलाही सामना होतो, तेव्हा एका डावात दोन टाइम आऊट घेतले जातात. एक बँटिंग टीम कडून आणि दुसरा बॉलिंग टीमकडून घेतला जातो. आतापर्यंत हा स्ट्रॅटर्जिक टाईम १५० सेकंदांचा असे. मात्र आता तो वाढवून तीन मिनिटांचा केला जाणार आहे. म्हणजेच त्यामध्ये ३० सेकंदांची वाढ होणार आहे. हे तीस सेकंद खूप आहे.