क्रिकेटच नाही तर चहुबाजूंनी होतोय पैशांचा वर्षाव; २३ वर्षीय शुबमन गिल कोट्यवधीचा मालक

Shubman Gill on Demand : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. गिलने वन डे, कसोटी आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये शतक झळकावून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे.

मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या गिलवर चहुबाजूंनी पैशांचा वर्षाव होत आहे. चला तर मग जाणून घेऊया २३ वर्षीय शुबमन गिलची संपत्ती.

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिलने सनरायझर्स हैदराबादविरूद्ध आपले आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. गिलने ५८ चेंडूत १३ चौकार आणि एका चौकाराच्या मदतीने ही किमया साधली.

धावांचा पाऊस पाडणारा गिल बीसीसीआय आणि आयपीएल करारांसोबतच, चित्रपट, जाहिरात शूट यांमधून भरपूर पैसे कमवतो. कोट्यवधींची कमाई करणाऱ्या गिलच्या उत्पन्नाचे स्रोत देखील अनेक आहेत.

२३ वर्षीय शुबमन गिलला नुकताच एक मोठा चित्रपट मिळाला आहे. शुबमन या चित्रपटात काम करणार नसला तरी आवाज देणार आहे. सोनी पिक्चर्स इंडियाचा चित्रपट 'स्पायडर-मॅन: एक्रोस द स्पायडर-व्हर्स'मध्ये गिल भारतीय स्पायडर-मॅन (पवित्र प्रभाकर) चा आवाज असेल.

भारताचा युवा क्रिकेटर शुबमन गिलने या नव्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून आपली कमाई वाढवली आहे. CAKnowledge च्या माहितीनुसार, शुबमन गिलची एकूण संपत्ती ३२ कोटी एवढी आहे. गिलचे पंजाबमध्ये एक आलिशान घर असून महागड्या गाड्या आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) २०२२-२३ च्या हंगामातील वार्षिक खेळाडूंच्या करारानुसार, भारतीय सलामीवीराला बी श्रेणीतील खेळाडूंच्या यादीत पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याला वर्षाला ३ कोटी एवढे मानधन मिळेल.

शुबमन गिलला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने ८ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते. यापूर्वी गिल काही वर्षे कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. CAKnowledge ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात टायटन्समध्ये सामील होण्यापूर्वी गिलने आयपीएलमधून एकूण २३ कोटी रुपये कमावले.

बीसीसीआय आणि आयपीएलच्या कराराशिवाय गिल ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. शुबमन गिल सीएट, नाइक, फियामा, जिलेट, एंगेज यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँडचा प्रचार करतो. याशिवाय गिल 'शांतनू निखिल क्रिकेट क्लब' या फॅशन ब्रँडचा ॲम्बेसेडरही आहे.

शुबमन गिलचे मोहाली येथे आलिशान घर आहे. स्पोर्ट्सकीडाने दिलेल्या वृत्तानुसार, गिल पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील एका आलिशान घरासह अनेक मालमत्तांचा मालक आहे.

गिलकडे दोन आलिशान वाहने आहेत. यामध्ये लक्झरी रेंज रोव्हर कारचा समावेश आहे, ज्याची किंमत २०१९ मध्ये ८९ लाख रुपये होती. गिलच्या रेंज रोव्हर वेलारची किंमत आता १ कोटीच्या घरात आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शुबमन गिलला २०२१ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महिंद्रा थार भेट दिली होती. या SUV ची किंमत १४.१६ लाख आहे.