भारतापुढे न्यूझीलंडने विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता.
रोहित बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
राहुल आणि कोहली हे फक्त सहा धावांच्या अंतराने बाद झाले.
दोन स्थिरस्थावर झालेले फलंदाज बाद झाल्याचे पाहता न्यूझीलंडने चांगलीच कंबर कसली होती.
न्यूझीलंडने त्यानंतर भेदक मारा करत सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न सुरु केले.
पण न्यूझीलंडच्या विजयाच्या स्वप्नांना सुरुंग लावला ते श्रेयसने.
श्रेयसने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि तुफानी फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
श्रेयसने या सामन्यात २९ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर सामनावीर हा पुरस्कारही पटकावला.