'रोहित शर्माकडे वर्ल्ड कप जिंकणारा संघच नाही, त्याने कर्णधारपदाची जबाबदारी घ्यायला नको हवी होती'

१२ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माला खेळण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु आज त्याच्याच नेतृत्वाखाली संघ वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे.

१२ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माला खेळण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु आज त्याच्याच नेतृत्वाखाली संघ वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. भारतात ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप होतोय आणि रोहितच्या नेतृत्वाखाली ICC स्पर्धांचा दुष्काळ टीम इंडिया संपवेल असा विश्वास चाहत्यांना वाटतोय, पण...

२०१५ आणि २०१९च्या वन डे वर्ल्ड कप संघाचा तो सदस्य होता आणि इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याने ५ शतकं झळकावून इतिहास घडवला होता. पण, भारताला उपांत्या फेरीत हार मानावी लागली होती. २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला जेतेपदाचा दावेदार म्हटले जात आहे, परंतु पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने मोठा दावा केला आहे.

शोएबच्या मते भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार नाही. भारताकडे वर्ल्ड कप जिंकेल असा संघच नसल्याचेही त्याने RevSportzला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. यावेळी त्याने रोहितने संघाचे नेतृत्व स्वीकारायला नको हवे होते, असाही दावा केला आहे.

''मी जेव्हा रोहित शर्माला पाहतो, तेव्हा मी स्वतःला एकच प्रश्न विचारतो की, रोहितने कर्णधारपद स्वीकारायला हवं होतं का? माझ्या मते रोहित कर्णधारपदाला ओझं मानतो आणि त्याचं दडपण तो घेतो. कर्णधारपदाचं दडपण तुम्हाला गांगरून टाकतं आणि विराट कोहलीसोबतही हेच झालं आहे. त्यामुळेच तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकू शकत नाही,''असे अख्तर म्हणाला.

''रोहितकडे वर्ल्ड कप जिंकणारा संघच नाही. एक फलंदाज म्हणून तो विराटपेक्षा वरचढ आहे. तो क्लासिकल फलंदाज आहे आणि जे फटके तो मारतो ते अविश्वसनीय आहेत, परंतु कर्णधारपद त्याला झेपतंय का? त्याने मला चुकीचं ठरवावं, सर्व भारतीयांनाही हेच वाटतंय,''असेही अख्तरने स्पष्ट केले.