६ अनलकी! भारताच्या वर्ल्ड कप संघातून OUT झालेले सहा मोठे खेळाडू

कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी मंगळवारी श्रीलंकेत पत्रकार परिषद घेतली अन् आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल ही सप्राईज निवड ठरली. तळाला फलंदाजी करू शकतील हा विचार डोक्यात ठेवून संघात ४ अष्टपैलू खेळाडू निवडले गेले. पण, ६ अशी नावं जे अनलकी ठरले.

मार्च २०२३ पासून वन डे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या लोकेश राहुल वर्ल्ड कप स्पर्धेतून वन डे संघात आहे. इशान किशन याचा फॉर्म लक्षात घेता, त्यालाही संघात कायम ठेवले गेले आहे. फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यांच्यावर असेल. जलदगती गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्यासह शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या हे पर्याय आहेत. रोहित शर्मा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, लोकेश राहुल असे ७ स्पेशालिस्ट फलंदाज संघात आहेत आणि त्यांना बळ देण्यासाठी ४ अष्टपैलूही संघात आहेत.

शिखर धवन : आयसीसी स्पर्धा गाजवणाऱ्या Shikhar Dhawan ला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात संधी मिळालीच नाही. शुबमन गिलने मिळालेल्या संधीचं सोनं करताना संघातील स्थान पक्कं केलं अन् त्यामुळे ३७ वर्षीय गब्बरला पुनरागमनाची संधीच मिळाली नाही. धवनने १६७ वन डे सामन्यांत ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आहेत. त्यात १७ शतकं व ३९ अर्धशतकं आहेत.

संजू सॅमसन : उजव्या हाताचा विकेटकीपर-फलंदाज आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील राजस्थान रॉयल्सचा कर्णधार Sanju Samson ला भारताच्या वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आले. सॅमसन सध्या श्रीलंकेत भारतीय संघासोबत आशिया कप संघात राखीव खेळाडू म्हणून आहे. त्याने १३ वन डे सामन्यांत ३ अर्धशतकांच्या मदतीने ५५.७१ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत.

युझवेंद्र चहल: अनुभवी लेग-स्पिनर Yuzvendra Chahal जो भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा दीर्घकाळ सदस्य होता. पण, त्यालाही वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेले नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे चहलला संघातून वगळण्यात आले. चहलने ७२ वन डे सामन्यांमध्ये १२१ विकेट्स घेतल्या आहेत. तो २०१९च्या वर्ल्ड कप संघाचा भाग होता.

रविचंद्रन अश्विन: अनुभवी उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर Ravichandran Ashwin देखील वर्ल्ड कप संघातून डावलला गेला आहे. भारताने संघात ऑफ-स्पिनरची निवड करावी की नाही, विशेषत: अपवादात्मक डावखुरा फलंदाज असलेल्या संघांचा सामना करण्यासाठी मोठा वादविवाद झाला. रोहित आणि निवडकर्त्यांना अश्विनचा समावेश करण्याची गरज वाटली नाही. अनुभवी गोलंदाजाने भारतासाठी दोन वन डे वर्ल्ड कप ( २०११ आणि २०१५ ) खेळले आहेत. त्याने ११३ वन डे सामने खेळले आहेत आणि १५१ बळी घेतले आहेत.

प्रसिध कृष्ण: वेगवान गोलंदाज Prasidh Krishnaने दुखापतीमुळे प्रदीर्घ विश्रांतीनंतर नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, परंतु त्याला वर्ल्ड कप संघातून वगळले. कृष्णा सध्या भारताच्या आशिया चषक संघाचा भाग आहे. कृष्णाने भारताकडून १४ वन डे त २५ बळी घेतले आहेत.

तिलक वर्मा : गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू Tilak Varma चांगला खेळला. त्यामुळे त्याला भारताच्या आशिया कप संघात स्थान देण्यात आले. २० वर्षीय खेळाडूने अद्याप भारतासाठी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये वर्माने २५ सामन्यांमध्ये पाच शतकं आणि अर्धशतकांच्या मदतीने १२३६ धावा केल्या आहेत.