भारतीय संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन याने कसोटीतून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी खास पोस्ट शेअर केलीये.
'गब्बर'नं इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोत तो रोहित शर्मासोबत टेस्ट जर्सीत दिसतोय.
शिखर धवन याने विराट कोहलीसोबत शेअर केलेला फोटोही एकदम खास अन् दोघांच्यातील क्लास पार्टनरशिपची आठवण करून देणारा आहे. क्रिकेट पिचवर फक्त शॉट्स नाही तर मैत्रीही फुलते, या खास कॅप्शनसह त्याने दोन दिग्गजांसोबत खेळण्याची संधी ही ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे म्हटले आहे.
शिखर धवन आणि विराट कोहली या जोडीनं २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी २२७ धावांची दमदार भागीदारी केल्याचाही रेकॉर्ड आहे.
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या क्रिकेटच्या मैदानात सुपर हिटशोबद्दल बोलायचं तर २०१३ ते २०२२ या कालावधीत टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना दोघानी ५१४८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. वनडेतील ही चौथ्या क्रमांकाची यशस्वी सलामी जोडी ठरलीये.
इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मानं कसोटीतून निवृत्तीची घोषणा केल्यावर पाचव्या दिवशी विराट कोहलीनंही कसोटीतील आपला १४ वर्षांचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही दिग्गजांनी टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर ते फक्त वनडेत खेळताना दिसतील. दोघांपैकी कोण अधिकाळ या फॉर्मेटमध्ये टिकून राहणार तेही पाहण्याजोगे असेल.
विराट कोहलीनं २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केल्यावर २०१३ मध्ये याच संघाविरुद्ध रोहित शर्मानं कसोटी संघात एन्ट्री मारली होती. रोहितनं ६७ कसोटी सामन्यात ४३०९ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला कोहलीनं १२३ कसोटी सामन्यात ९२३० धावा काढल्या. रोहित ५ हजार कसोटी धावांपासून दूर राहिला. दुसरीकडे कोहली १० हजार कसोटी धावा करण्यापासून मागे राहिला.