Shahid Afridi vs Sourav Ganguly : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी बेताल वक्तव्याने नेहमी चर्चेत असतो. नेहमी वादात अडकणाऱ्या आफ्रिदीने पुन्हा एकदा भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडूने यावेळी सौरव गांगुली अध्यक्ष असलेल्या BCCIला चॅलेंज दिले आहे.
काश्मीर प्रीमिअर लीगचे दुसरे पर्व होणार असल्याचे सांगून त्याने बीसीसीआयला आव्हान दिले. मागील वर्षी सुरू झालेल्या KPL मध्ये ७ संघांचा समावेश होता आणि यात आफ्रिदीसह पाकिस्तानात जन्मलेल्या खेळाडूंचा समावेश होता. आयसीसीने या स्पर्धेला अद्याप मान्यता दिलेली नाही.
बीसीसीआयने या लीगला विरोध केला आहे. पाक व्याप्त काश्मीरातील मुझफ्फराबाद येथे ही लीग खेळवली गेली होती. या लीगच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षल गिब्स यानेही बीसीसीआयवर आरोप केले होते. या लीगमध्ये न खेळण्याची धमकी बीसीसीआयने दिल्याचे गिब्स म्हणाला होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या लीगला मान्यता दिली आहे आणि या लीगमध्ये खेळू नका असा दबाव बीसीसीआयकडून टाकला जात असल्याचा आरोपही PCB ने केला आहे. यावरूनच आफ्रिदीने पुन्हा बीसीसीआयला डिवचले. तो म्हणाला, माझा बीसीसीआयला एकच मॅसेज आहे की KPL 2 लवकरच होणार.
याचवेळी आफ्रिदीने ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पाकिस्तानचा संघ जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. ''पाकिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तुम्ही आयसीसी क्रमवारी पाहिलीत तर अव्वल पाचमध्ये पाकिस्तानचे खेळाडू दिसत आहेत. याआधी असं कधी घडलं नव्हतं,''असेही आफ्रिदी म्हणाला.