Sanju Samson, IND vs NZ: "संजू सॅमसनचे करियर 'या' भारतीय क्रिकेटरप्रमाणेच उद्ध्वस्त होणार"; Pakistani क्रिकेटरची भविष्यवाणी

संजू सॅमसनला ६ पैकी केवळ एका सामन्यात संधी

Sanju Samson, IND vs NZ: टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवट कटू झाला. टी२० मालिकेत भारताने (Team India) १-०ने विजय मिळवला. पहिला सामना पावसाने रद्द झाला. दुसरा सामना भारताने जिंकला तर तिसरा सामना DLS पद्धतीनुसार बरोबरीत सुटला.

वन डे मालिकेत मात्र भारतीय खेळाडूंचा खेळ अतिशय सुमार झाला. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तीनशेपार मजल मारली. पण गोलंदाजांनी निराशा केली. त्यानंतरचे दोनही सामने पावसामुळे वाया गेले.

न्यूझीलंड दौऱ्यावर प्रतिभावान विकेटकिपर संजू सॅमसन याला फारशी संधी मिळाली नाही. सहापैकी केवळ एका सामन्यात त्याचा संघात सहभाग होता. यावरून बराच वाद झाला. तशातच, संजू सॅमसनचे करियर दुसऱ्या एका भारतीय क्रिकेटरप्रमाणेच उद्ध्वस्त होणार असल्याचे बोचरी भविष्यवाणी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने केली.

बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणामुळे सॅमसनला संधी मिळू शकली नाही, असा आरोप पाकिस्तानचा (Pakistan) माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) केला. तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी त्याने संजू सॅमसनला संधी न मिळाल्याबद्दल बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला चांगलंच सुनावलं.

"एखादा खेळाडू किती सहन करू शकतो यालाही सीमा आहेत. त्याने आधीच खूप काही सहन केले आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो नक्कीच दमदार कामगिरी करून दाखवतो. जर अशाप्रकारे त्याला संधी नाकारण्यात आली तर क्रिकेट एका चांगल्या खेळाडूला मुकेल. संजू सॅमसनला खेळताना पाहण्याची इच्छा अनेक भारतीयांची आहे. पण त्याचे करियर दुसऱ्या एका भारतीय खेळाडूप्रमाणे उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने जात आहे," असे कनेरिया म्हणाला.

कनेरियाने संजू सॅमसनची तुलना एका निवृत्त खेळाडूशी केली. "अंबाती रायडूची (Ambati Rayudu) कारकीर्दही अशीच संपली. त्याने खूप धावा केल्या, पण त्याला संधीच देण्यात आली नाही. त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्याचे कारण- बीसीसीआय आणि निवड समितीचे अंतर्गत राजकारण. खेळाडूंबद्दलही काही आवडीनिवडी किंवा नापसंती असू शकतात का?" असा थेट सवाल त्याने केला.