भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगर अखेर ज्या क्षणाची वाट पाहत होती, तो क्षण तिच्या आयुष्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिला जे करायचे होते, त्यासाठी तिला तिच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाला आहे.
जन्मत: मुलगा असलेला आर्यन शस्त्रक्रिया करून मुलगी बनली. अनाया बांगर म्हणून ओळख मिळाल्याने गेल्या दोन वर्षांपासून ती चर्चेत आहे. तिच्या आणि संजय बांगर यांच्याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित झाले. पण या काळात वडील गप्प राहिले. आता मात्र ते अनायाला पाठिंबा देताना दिसत आहेत.
एका मुलाखतीत अनायाने खुलासा केला की, तिचे वडील संजय बांगर आणि कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि आर्थिक मदतीनंतर तिने एक विशेष शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी मार्चमध्ये अनायाची 'जेंडर अफर्मेशन सर्जरी' (GAS) होणार आहे.
अनाया मार्च २०२६ मध्ये थायलंडमधील एका क्लिनिकमध्ये ही शस्त्रक्रिया करून घेणार आहे. या प्रक्रियेसाठी तिला तिथे सुमारे महिनाभर राहावे लागणार आहे. गेली पाच वर्षे अनाया या शस्त्रक्रियेसाठी घरच्यांच्या पाठिंब्याची वाट पाहत होती. अखेर आता तिला हिरवा कंदील मिळाला आहे.
GAS ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने 'जेंडर डिस्फोरिया' दूर करण्यासाठी केली जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या जन्मतः असलेल्या लिंगाऐवजी दुसऱ्या लिंगाची ओळख अधिक जवळची वाटते, तेव्हा होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी ही शारीरिक बदल करणारी शस्त्रक्रिया केली जाते.
अनाया बांगर थायलंडमधील एका नावाजलेल्या क्लिनिकमध्ये यासंबंधीची शस्त्रक्रिया करून घेणार असून त्यानंतर तिला पुन्हा एकदा दीर्घकाळ विश्रांती घ्यावी लागेल. ज्यामुळे अनया पुढील सहा महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. पण ती या टप्प्यावर पोहोचल्याबद्दल आनंदी आहे.
गेल्या पाच वर्षांपासून आपल्या ओळखीसाठी संघर्ष करणाऱ्या अनाया बांगरला आता तिच्या कुटुंबाचा आणि विशेषतः वडील संजय बांगर यांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. अनायाने स्पष्ट केले आहे की, ती लवकरच जेंडर अफर्मेशन सर्जरीची प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहे.