भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ( Sania Mirza) पती शोएब मलिक ( Shoaib Malik) याच्या फिटनेसवर फिदा झाली आहे. शोएबचा फिटनेसपाहून तो आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकतो, असे तिला वाटते. पाकिस्तान संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज मलिक हा आता ४० वर्षांचा आहे.
सानियाने नुकत्याच एका मुलाखतीत शोएब मलिकच्या फिटनेसबाबत सांगितले. शोएब मलिकने १९९९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता वयाच्या चाळीशीतही त्याची क्रिकेटच्या मैदानावरील चपळता अनेक युवा खेळाडूंना थक्क करून जाते. त्याने फलंदाजीतील फॉर्मही कायम राखला आहे.
क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत सानिया म्हणाली,''शोएब खुप सुखी माणूस आहे. तो सातत्याने सर्वोत्तम खेळ करण्यासाठी प्रयत्नशील असतो. फिटनेस कसा असावा याचे उत्तम उदाहरण तो आहे. मी त्याला सांगितले आहे की जर तुझ्यात मानसिक दडपण पेलण्याची तयारी असेल तर आणखी दोन वर्ष तू क्रिकेट खेळ.''
सानियाने भविष्यातील वाटचालीबाबत सांगितले की,''आम्ही नुकतेच परफ्युम लाँच केले आहे आणि हा अनुभव आम्हा दोघांसाठी नवा होता. या व्यतिरिक्त अन्य व्यावसायातही आम्ही गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात आहोत. शोएबच्या वाटचालीबाबत तुम्हाला त्यालाच विचारावे लागेल.''
सानियाने हेही सांगितले की दोघंही बायोपिकबाबत विचार करत आहोत. सानिया म्हणाली, आम्ही काही लोकांसोबत दोघांच्या बायोपिकबाबत चर्चा केली आहे. कोरोना व्हायरसमुळे या प्रक्रियेला थोडा ब्रेक लागला होता.
सानियाने २०२२मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
शोएबनं गुडघ्यावर बसून सानियाला प्रपोज केलं होतं. अशा फिल्मी स्टाईलनं प्रपोज करणाऱ्यांपैकी तो नाही. पण, तरीही त्यानं सानियासाठी असं केलं. हाच सच्चेपणा सानियाला भावला.
शोएबशी लग्न होण्यापूर्वी सानियानं 2009मध्ये लहानपणीचा मित्र सोहराब मिर्झा याच्याशी साखरपुडा केला होता. पण, दोघांचं नातं तुटलं अन् तिच्या आयुष्यात शोएब आला. 5 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर 12 एप्रिल 2010मध्ये दोघांनी विवाह केला. आता या दोघांना इझान नावाचा मुलगा आहे.