"सही ट्रॅक पे आ जा...जैसे पहिले था!" कमबॅकसाठी पृथ्वी शॉला क्रिकेटच्या देवानं दिला मंत्र

हा मंत्र जपत पृथ्वी शॉ पुन्हा ट्रॅकवर येणार का? ते पाहण्याजोगे असेल.

पृथ्वी शॉ अनेक दिवसांपासून क्रिकेटशिवाय मैदानाबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत आहे. टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडत असलेल्या पृथ्वी शॉला क्रिकेटच्या देवानं अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मोलाचा सल्ला दिला आहे.

न्यूज २४ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये युवा पृथ्वी शॉनं सचिन तेंडुलकर सुरुवातीपासून प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनसोबत वयाच्या ८-९ व्या वर्षांपासून चांगली मैत्री असल्याची गोष्टही पृथ्वी शॉनं शेअर केली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच बांद्रा येथील MIG क्लबमध्ये सचिन सरांना भेटलो. त्यांना अजूनही माझ्यावर भरवसा आहे, असे सांगत पृथ्वी शॉनं क्रिकेटच्या देवाकडून मोलाचा सल्ला मिळाल्याचेही सांगितले.

"सही ट्रॅक पे आ जा...जैसे पहिले था..." अजून वेळ गेलेली नाही. १३-१४ वर्षांत सर्वकाही शक्य होऊ शकते. फक्त तू योग्य मार्गावर परत ये, ज्या मार्गावर तू आधी होतास.. अशा शब्दांत त्याला क्रिकेटच्या देवानं कमबॅकचा मंत्र दिला आहे.

वयाच्या अवघ्या १४ वर्षी पृथ्वी शॉने क्रिकेटच्या मैदानात आपल्या आक्रमक अंदाजामुळे सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. २०१३ मध्ये हॅरिस शील्ड ट्रॉफी स्पर्धेत त्याने ५४६ धावांची खेळी करून निवडकर्त्यांचे लक्षवेधून घेतले होते.

२०१७ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळीसह त्याने आपल्यातील धमक दाखवली.

२०१८ मध्ये वयाच्या १८ व्या टीम इंडियाकडून पदार्पणाचा सामना खेळताना वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती.