क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या रणजी संघात निवड झाली आहे. १३ जानेवारीला महाराष्ट्राविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.
या संघाचं नेतृत्व सलामीवीर पृथ्वी शॉकडे सोपवण्यात आलं आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबई ४१ वेळा रणजी चॅम्पियन आहे आणि यावेळी त्यांना नऊ टीमच्या एलिट ग्रुप सी मध्ये स्थान देण्यात आले आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या हंगामात अखेरचं नाव अर्जुन तेंडुलकरचं ठेवण्यात आलं होतं. पहिल्यांदा आयपीएलमध्ये (IPL) सामील झालेल्या अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) त्याची बेस प्राईज २० लाखांत संघात सामील करुन घेतलं होतं.
मात्र, तो आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नाही आणि दुखापतीमुळे त्याला टूर्नामेंटमधूनच बाहेर पडावे लागले. त्याच वर्षी, त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईसाठी पदार्पण केले.
मुंबई संघ १३ जानेवारीपासून महाराष्ट्राविरुद्ध आपल्या स्पर्धेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर २० जानेवारीपासून कोलकाता येथे त्याचा सामना दिल्लीशी होईल. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान, अरमान जाफर, आकर्षित गोमेल आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरे यांचा २० जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
या संघात पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (विकेटकीपर), हार्दिक तमोर (विकेटकीपर), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अटारडे , धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर यांचा समावेश करण्यात आलाय.
यापूर्वी मुंबई इंडियन्सनं अर्जुन तेंडुलकरला रिलिज केलं होतं. इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी ( IPL 2022) आता मेगा ऑक्शन होणार आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे क्विंटन डी कॉक, हार्दिक व कृणाल पांड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट ही काही प्रमुख नावं आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार नाही.
मागच्या लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्सनं अखेरच्या बोलीवर अर्जुनला २० लाखांच्या मूळ किमतीत ताफ्यात घेतलं होतं. पण, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुननं मुंबईच्या सीनिअर संघात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 लीगमधून पदार्पण केलं होतं. त्यात त्यानं दोन सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या. मुंबईच्या सीनियर संघाकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला होता.
IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात अर्जुननं दुखापतीमुळे माघार घेतली. मुंबई इंडियन्सनं त्याचा बदली खेळाडू म्हणून दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंगची निवड केली होती. पण, आता तर अर्जुनला रिलिज केलं गेलं आहे. तो आता पुन्हा लिलिवात उतरणार आहे आणि यावेळी त्याला मुंबई इंडियन्स पुन्हा घेतील का, याची उत्सुकता लागली आहे. यावेळेसही त्याची मूळ किंमत ही २० लाख असणार आहे.