हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. त्यात इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने ( MI ) आयपीएल २०२४ साठी संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हिटमॅनचे फॅन नाराज झाले आहेत. पण, त्यांची ही नाराजी दूर होणारी बातमी समोर आली आहे.

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारताला थोड्याच ट्वेंटी-२० लढती खेळायच्या आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ५ सामन्यांची मालिका भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

या दौऱ्यावर सूर्यकुमारला दुखापत झाली आणि तो जानेवारी २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकणार असे वृत्त समोर आले आहे. घोट्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला ७ आठवडे लागतील आणि तो फेब्रुवारीत मैदानावर उतरेल. मात्र, तेव्हा भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत असेल. अशात सूर्या थेट आयपीएल २०२४ मध्ये खेळणार आहे.

सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या अफगाणिस्तान दौऱ्यातून पुनरागमन करेल आणि संघाचे नेतृत्व पुन्हा सांभाळेल, असे वाटले होते. पण, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत जखमी झालेल्या हार्दिकचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मैदानावरील ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतून आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले. तो अफगाणस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळणे अपेक्षित होता, परंतु PTI ने दिलेल्या वृत्तानुसार तो याही मालिकेत मुकणार आहे.

भारतीय संघ ११ ते १७ जानेवारी २०२४ दरम्यान अफगाणिस्ताविरुद्धची मालिका होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ही भारताची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. पण, सूर्यकुमार व हार्दिक हे दोघंही या मालिकेत खेळणार नसल्याने टीम इंडियाचा कॅप्टन कोण, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. हार्दिक पांड्या आयपीएल २०२४च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याचेही वृत्त आहे.

अशा परिस्थितीत टीम इंडियाचे आणि मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहितने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे, पण, कर्णधारपद मिळेल तरच खेळेन, अशी अट रोहितने ठेवली होती. सद्यस्थिती पाहता रोहितकडे नेतृत्व जाऊ शकते. मुंबई इंडियन्सच्याही सुरुवातीच्या काही सामन्यांत रोहित नेतृत्व करू शकतो.