ICC Men's Test team of year 2021मध्ये रोहित शर्मासह तीन भारतीयांनी पटकावले स्थान; केन विलिम्सनकडे संघाचे नेतृत्व

ICC Men's Test team of year 2021 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१ या वर्षातील ट्वेंटी-२० व वन डे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान पटकावता आलेले नाही. पण, कसोटी संघात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे.

ICC Men's Test team of year 2021 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१ या वर्षातील ट्वेंटी-२० व वन डे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान पटकावता आलेले नाही. पण, कसोटी संघात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला प्रथमच तीनही संघांमध्ये स्थान मिळालेलं नाही. आयसीसीनं आज जाहीर केलेल्या कसोटी संघात रोहित शर्मासह ( Rohit Sharma) भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्या खांद्यावर या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दिमुथ करुणारत्ने ( श्रीलंका) - श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने यानं मागील वर्ष गाजवलं. त्यानं ७ सामन्यांत ६९.३८च्या सरासरीनं ९०२ धावा केल्या आहेत. त्यात चार शतकांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्धचे द्विशतक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीतील शतक हे त्याच्या कसोटी कारकीर्दितील अविस्मरणीय क्षण आहेत. आयसीसीच्या कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी त्याला नामांकन मिळाले आहे.

रोहित शर्मा ( भारत ) - कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मानं त्याचं नाणं खणखणीत वाजवले आहे. त्यानं २०२१मध्ये दोन शतकी खेळी करताना ४७.६८च्या सरासरीनं ९०६ धावा केल्या आहेत. दोन्ही शतकं ही इंग्लंडविरुद्ध ( चेन्नई व ओव्हल) परस्परविरोधी वातावरणात झालेली आहेत.

मार्नस लाबुशेन ( ऑस्ट्रेलिया ) - ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील सक्षम फलंदाज मार्नस लाबुशेन यानं २०२२मध्येही दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत लाबुशेन अव्वल स्थानावर आहे. त्यानं मागील वर्षी ५ कसोटींमध्ये ६५.७५च्या सरासरीनं ५२६ धावा केल्या आहेत आणि त्यात दोन शतकांचा समावेश आहे.

जो रूट ( इंग्लंड) - इंग्लंड संघाची कसोटीतील कामगिरी फार चांगली झालेली नसली तरी कर्णधार जो रूटची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यानं १५ कसोटींत ६१च्या सरासरीनं १७०८ धावा केल्या आहेत. त्यात सहा शतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रूट तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केन विलियम्सन ( न्यूझीलंड) - केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडनं पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. आयसीसीच्या कसोटी संघाचेही नेतृत्व केनकडे सोपवले गेले आहे. त्यानं ४ सामन्यांत ६५.८३च्या सरासरीनं ३९५ धावा केल्या आहेत.

फवाद आलम ( पाकिस्तान ) - ३६ वर्षीय फवाद आलमनं कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं. त्यानं ९ सामन्यांत ५७.१०च्या सरासरीनं ५७१ धावा कुटल्या. त्यानं दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज येथे शतकी खेळी केल्या.

रिषभ पंत ( भारत ) - भारताच्या तिनही फॉरमॅटच्या संघात रिषभ पंत ही पहिली पसंती आहे. त्यानं कसोटीत १२ सामन्यांत ७४८ धावा केल्या आहेत. अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्धचे त्याचे शतक हे महत्त्वाचे ठरले आहे. त्याशिवाय यष्टिंमागे त्यानं ३९ बळी टिपले आहेत.

आर अश्विन ( भारत ) - अश्विननं गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान दिले आहे. २०२१मध्ये त्यानं ९ सामन्यांत ५४ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड व न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या घरच्या मैदानावरील मालिकेत त्यानं प्रभाव पाडला. शिवाय त्यानं ३५५ धावाही केल्या आहेत, त्यात इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीतील शतकाचा समावेश आहे.

कायले जेमिन्सन ( न्यूझीलंड ) - न्यूझीलंडच्या या गोलंदाजानं ५ सामन्यांत २७ विकेट्स घेलत्या आहेत आणि १०५ धावाही केल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये तो प्लेअर ऑफ दी मॅच होता.

हसन अली ( पाकिस्तान ) - पाकिस्तानच्या गोलंदाजानं २०२१मध्ये ९ सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या आहेत.

शाहिन आफ्रिदी ( पाकिस्तान) - यानेही ९ सामन्यांत ४७ विकेट्स घेतल्या आहेत.