Roger Binny: 2 वर्ल्ड कप जिंकणारे रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्यक्ष, जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्व काही

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची धुरा आता बिन्नी यांच्या खांद्यावर असणार आहे. खरं तर ते बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष झाले आहेत. रॉजर बिन्नी सौरव गांगुली यांच्या जागी पदभार सांभाळतील. गांगुलींनी 2019 ते 2022 पर्यंत हे पद भूषवले होते. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. मात्र ही बैठक केवळ औपचारिकता मानली जात होती. कारण नवीन अध्यक्षाबाबत निर्णय फार पूर्वीपासून झाला असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत रॉजर बिन्नी यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली.

रॉजर बिन्नी हे भारतातील पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू आहेत. 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ते महत्त्वाचा चेहरा होते. त्या विश्वचषकात त्याचे योगदान खूप महत्त्वाचे होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत प्रथमच विश्वचषकाचा किताब पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे रॉजर बिन्नी या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज ठरले होते. या स्पर्धेत त्यांनी आठ सामन्यांत एकूण 18 बळी घेतले. त्यांची सर्वोत्तम कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहिली, ज्यामध्ये त्यांनी 29 धावा देऊन 4 बळी पटकावले. तसेच त्यांची एकदिवसीय कारकिर्दीतील देखील हीच सर्वोत्तम कामगिरी ठरली.

विशेष बाब म्हणजे विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील ते पहिले बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे केवळ चारच खेळाडू आतापर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आहेत. यामध्ये, विजयनगरचे महाराजकुमार, शिवलाल यादव, सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी या दिग्गजांचा समावेश आहे. रॉजर बिन्नी हे 2000 मध्ये भारतीय अंडर-19 संघाचे प्रशिक्षक देखील राहिले आहेत. तेव्हा त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंडर-19चा किताब पटकावला होता. भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार हा मोहम्मद कैफ होता, तर त्या संघात युवराज सिंग आणि वेणुगोपाल राव यांसारख्या खेळाडूंचा समावेश होता.

बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी 1979 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यांनी पाकिस्तानविरूद्ध बंगळुरू येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. यानंतर 1980 मध्ये बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रॉजर बिन्नी यांची कारकीर्द 1979 ते 1987 पर्यंत सुरू राहिली. यादरम्यान त्यांनी भारतासाठी 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला. बिन्नी यांच्या नावावर कसोटीत 47 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 77 बळींची नोंद आहे. याशिवाय बिन्नी यांनी कसोटीत 830 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 629 धावा केल्या आहेत.

रॉजर बिन्नी यांच्याशी संबंधित एक अद्भुत योगायोगही आहे. 1979 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या रॉजर यांनी अखेरची कसोटी देखील पाकिस्तानविरुद्ध खेळली होती. त्याचवेळी रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला होता, तो देखील एकदिवसीय सामना होता. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बिन्नी यांनी कांगारूच्याच संघाविरूद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला.

रॉजर बिन्नी बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक देखील राहिले आहेत. सौरव गांगुली यांच्या राज्यात त्यांनी हा पदभार सांभाळला होता. याशिवाय बिन्नी हे भारतीय संघाचे निवडकर्तेही राहिले आहेत. त्यांच्यामुळेच त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीला भारतीय संघात स्थान मिळाले, असा आरोपही त्यांच्यावर अनेकदा करण्यात आला. स्टुअर्ट बिन्नी हा देखील त्याच्या वडिलांप्रमाणेच अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने भारतासाठी सहा कसोटी, 14 एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये स्टुअर्ट बिन्नीने 21.56 च्या सरासरीने 194 धावा केल्या असून 3 बळी घेतले आहेत. तसेच त्याने 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 28.75 च्या सरासरीने 230 धावा आणि 20 बळी घेतले आहेत. स्टुअर्टच्या नावावर तीन टी-20 सामन्यांमध्ये 120.69 च्या सरासरीने 35 धावा आणि एका बळीची नोंद आहे. स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आहे. त्याने 2014 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केवळ चार धावा देऊन सहा बळी पटकावले होते. तर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर स्पोर्ट्स अँकर आहे.