Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंत की दिनेश कार्तिक, T20 World Cup कोण खेळणार?; राहुल द्रविडचं मोठं विधान

Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंतचा फॉर्म हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारा ठरतोय.. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती, तरीही त्याच्याकडून त्याच त्याच चुका झालेला पाहायला मिळाल्या.

Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंतचा फॉर्म हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारा ठरतोय.. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती, तरीही त्याच्याकडून त्याच त्याच चुका झालेला पाहायला मिळाल्या. बाहेरच्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह तो आवरू शकला नाही आणि एकाच पद्धतीने त्याने विकेट फेकली. अशात 37 वर्षीय दिनेश कार्तिकने दमदार पुनरागमन करून रिषभची चिंता वाढवल्याची चिन्हे दिसत आहेत.

आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून निवड समिती व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर बारीक लक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत रिषभला 105 च्या स्ट्राईक रेटने 58 धावाच करता आल्या आहेत. अशात राहुल द्रविडने त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातील स्थानाबाबत मोठे विधान केले आहे.

दरम्यान, रिषभ पंत हा भारताच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या नियोजनातील अविभाज्य घटक असल्याचे विधान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले. द्रविड म्हणाला,''वैयक्तिकरित्या, त्याला आणखी काही धावा करायला आवडेल पण ही गोष्ट त्याला सतावत नाही. तो आमच्या भविष्यातील योजनांचा खूप मोठा भाग आहे.''

एका मालिकेतील कामगिरीच्या जोरावर पंतला जज करू नका, असे सांगताना मधल्या फळीतील त्याचे महत्त्व द्रविडने पटवून दिले. ''मी फक्त टीका करू इच्छित नाही. मधल्या षटकांमध्ये तुम्हाला आक्रमक खेळ करणारा फलंदाज हवा असतो, जो सामना वेगाने पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे दोन किंवा तीन सामन्यांच्या कामगिरीवर एखाद्याला जज करणे चुकीचे आहे,''असे द्रविडने स्पष्ट केले.

तो पुढे म्हणाला,''इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रिषभने चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्ये त्याने फलंदाजीत वरच्या क्रमांकावर येताना सरासरी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडून आणखी चांगले नंबर्स पाहायला मिळतील, अशी आम्हाला आशा आहे. ''

''आक्रमक खेळ करण्याच्या प्रयत्नात, त्याच्याकडून काही सामन्यात चुका झाल्या असतील, परंतु तो आजही संघाचा अविभाज्य घटक आहे. मधल्या फळीत डावखुऱ्या फलंदाजाचे असणे महत्त्वावचे आहे. त्याने काही चांगल्या खेळीही केल्या आहेत,''असे द्रविड म्हणाला.