विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारतीय खेळाडूंना 20 दिवसांची सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत लंडनमध्ये भटकंती करत आहेत.
अशात कोरोना संकटात भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत युरो 2020 स्पर्धेतील जर्मनी वि. इंग्लंड यांच्यातला सामना पाहण्यासाठी पोहोचला. यावेळी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते आणि रिषभच्या चेहऱ्यावर मास्क नसल्यानं चाहत्यांनी तिथे कोरोना नाही का, असा सवाल त्याला केला आहे.
न्यूझीलंडकडून WTC Final मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय खेळाडूंना ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी, खेळाडूंना सुट्टी देण्यात आली आहे. सततच्या बायो बबलमधून खेळाडूंना थोडासं रिलॅक्स होण्यासाठी ही सुट्टी दिली आहे. पंतनं या ब्रेकमध्ये फुटबॉल सामना पाहण्याचा आनंद लुटला.
पंत मंगळवारी इंग्लंड विरुद्ध जर्मनी यांच्यातला यूरो कप उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहण्यासाठी विंबली स्टेडियमवर पोहोचला. इंग्लंडनं हा सामना 2-0 अशा फरकाने जिंकला.
पंत स्टेडियममध्ये मित्रांसोबत दिसला आणि त्यानं काही फोटो सोशल मीडियावरही पोस्ट केले.