३.८० कोटी VS ५५ लाख! IPL २०२३ मध्ये लखपतीचा 'सुपर' तर करोडपतीचा 'फ्लॉप' शो

Rinku Singh vs Riyan Parag : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेक युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करत असतात.

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेक युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करत असतात. या मोठ्या व्यासपीठावर खेळून ते आपल्या क्रीडा कौशल्याने जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडतात. अनेक युवा खेळाडू असे आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये चमकदार खेळ करून आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवली आहे.

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने शानदार खेळी करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. यंदाच्या हंगामात देखील अनेक युवा भारतीय खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत.

रिंकू सिंग केकेआर तर रियान पराग राजस्थान रॉयल्सच्या संघाचा हिस्सा आहे. रिंकूने गुजरात टायटन्सविरूद्ध अखेरच्या षटकात सलग पाच षटकार ठोकून केकेआरला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. तर दुसरीकडे रियान परागचा फ्लॉप शो अद्याप सुरूच आहे.

रिंकू सिंग आणि रियान पराग यांच्या मानधनात मोठे अंतर आहे. पण लाखोंमध्ये खेळणारा खेळाडू आता कोट्यवधींचे मानधन घेणाऱ्या खेळाडूवर भारी पडत आहे. २५ वर्षीय रिंकू सिंगला कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने ५५ लाख रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.

चालू हंगामात रिंकूने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये १७४ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. १६३ च्या सरासरीने फलंदाजी करणाऱ्या रिंकूने एकूण ९ चौकार आणि १३ षटकार लगावले आहेत.

उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या रिंकू सिंगची ट्वेंटी-२० कारकिर्दीतील एकूण कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने आतापर्यंत ८० सामन्यांमध्ये १४६८ धावा केल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७ शतकांची नोंद आहे.

दरम्यान, २१ वर्षीय रियान परागचा राजस्थान रॉयल्सचा संघ आताच्या घडीला क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याला राजस्थानच्या फ्रँचायझीने ३.८ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते. पण त्याचा या हंगामात फ्लॉप शो सुरूच आहे. त्याने ५ सामन्यांत केवळ ५४ धावा केल्या असून काल रियानने लखनौविरूद्ध १२ चेंडूत केवळ १५ धावा केल्या. लक्षणीय बाब म्हणजे राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला रियान परागची धिमी खेळी जबाबदार असल्याचे अनेक जाणकार म्हणत आहेत.

आसामचा अष्टपैलू खेळाडू रियान परागने ट्वेंटी-२० मध्ये ८६ सामन्यांत १५०९ धावा केल्या आहेत. याशिवाय फिरकी गोलंदाजी करताना त्याने २० बळी देखील घेतले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३ शतकांची नोंद आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे रिंकू सिंग आणि रियान पराग यांना अद्याप भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण एकूण कामगिरी पाहता रिंकू रियानच्या खूप पुढे असल्याचे पाहायला मिळते आहे.

आयपीएल २०२३च्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ ४ विजयांसह अव्वल स्थानावर आहे. तर केकेआरच्या संघाला ५ सामन्यांतील २ सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे ४ गुणांसह रिंकू सिंगचा संघ आठव्या स्थानी स्थित आहे.