"पैशांपेक्षा देश मोठा"; मुंबईत शिकलेल्या स्टार अँकरने बांगलादेशच्या क्रिकेट करारावर मारली लाथ

मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यापासून भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या वादाचे पडसाद आता थेट मैदानाबाहेरही उमटू लागले आहेत.

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठक हिला काढण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, रिद्धिमाने स्वतः समोर येत या वादावर पडदा टाकला आहे. तिने केवळ बीपीएल सोडले नाही, तर माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी आहे, असे म्हणत बांगलादेशला सडेतोड उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रिद्धिमा पाठकला बीपीएलमधून काढून टाकल्याच्या बातम्या फिरत होत्या. मात्र, रिद्धिमाने इंस्टाग्रामवर एक पत्रक जारी करत सत्य परिस्थिती समोर आणली.

मला काढले गेलेले नाही, तर मी स्वतः या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी माझा देश नेहमीच प्रथम स्थानी असतो. मी अनेक वर्षे प्रामाणिकपणे क्रिकेटची सेवा केली आहे आणि खेळाची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे." रिद्धिमाच्या या निर्णयाचे भारतीय चाहत्यांकडून मोठे कौतुक होत आहे.

हा सर्व वाद मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून डच्चू मिळाल्यानंतर सुरू झाला. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेत भारतात टी-२० वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला होता. इतकेच नाही तर बांगलादेशमध्ये आयपीएलच्या प्रक्षेपणावरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रिद्धिमा पाठकचे बीपीएल सोडणे हा बांगलादेशसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

रिद्धिमा पाठकच्या धाडसी निर्यणानंतर तिची जोरदार चर्चा सुरु आहे. रिद्धिमाचा जन्म १७ फेब्रुवारी १९९० रोजी झारखंडची राजधानी रांची येथे झाला. ती सध्या ३५ वर्षांची आहे. व्यवसायाने ती एक मॉडेल, अभिनेत्री, व्हॉइस आर्टिस्ट, टीव्ही प्रेझेंटर आणि अँकर आहे.

रिद्धिमाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात एका रेडिओ स्टेशनवर इंटर्नशिपने केली. नंतर तिने आरजे म्हणून तिची कारकीर्द सुरू केली. तिने स्टार स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स, सोनी आणि जिओवर अनेक क्रीडा कार्यक्रम सादर केले आहेत. ती आजही या चॅनेलशी जोडलेली आहे. चाहते तिच्या व्हॉइस मॉड्युलेशन आणि खेळांचे सखोल ज्ञान यांचे कौतुक करतात.

रिद्धिमाला टोकियो ऑलिंपिक दरम्यान लक्षणीय ओळख मिळाली. तिने माजी भारतीय आइस हॉकी खेळाडू वीरेन रस्किना यांच्यासोबत भारतीय हॉकी संघाचा विशेष आढावा घेतला होता.

रिद्धिमाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील रामनिरंजन पोद्दार येथून पूर्ण केले. ती तिच्या शालेय काळात वादविवाद आणि नाट्य कार्यक्रमांमध्ये भाग घेत खूप सक्रिय होती.२००८ मध्ये, रिद्धिमाने एमकेएसएस कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये ए. पदवी प्राप्त केली. लवकरच तिला त्या क्षेत्रात नोकरी मिळाली, पण आवडीमुळे तिने नोकरी सोडली.

आयसीसीच्या या पवित्र्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड आता बॅकफूटवर आले आहे. जागतिक स्पर्धेतून बाहेर पडणे बांगलादेशला परवडणारे नाही. त्यामुळे आता बीसीबी नमती भूमिका घेऊन भारत दौऱ्यावर येणार की आपली भूमिका कायम ठेवणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.