विश्वविजेत्या भारतीय महिला संघातील खेळाडूंवर कौतुकासह बक्षीसांचा वर्षाव सुरु आहे. यष्टीमागे बॅटरला अरेस्ट करणारी रिचा घोष ही आता DSP च्या वर्दीत रुबाब झाडताना दिसणार आहे.
पश्चिम बंगाल सरकारने रिचाला राज्य पोलीस खात्यात पोलीस उपअधीक्षक (DSP) पदावर नियुक्त केले आहे. या सन्मानामुळे ती भारताचा जलगदती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि दीप्ती शर्मा यांच्या पक्तींत ती सामील झाली आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रिचाच्या सन्मानार्थ खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रिचाला पोलीस अधीक्षक पदावर नियुक्त केल्याचे नियुक्ती पत्र प्रदान केले.
यावेळी २२ वर्षीय रिचाला राज्य सरकारकडून प्रतिष्ठित बंगभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून तिला गोल्डन बॅट आणि बॉलसह ३४ लाख रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रिचा घोष हिने ८ सामन्यातील ८ डावात पॉवर हिटिंग शो दाखवून देताना १२ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. वर्ल्ड कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटरच्या यादीत ती टॉपला राहिली.
नवी मुंबईतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये तिने ३४ धावांची महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त खेळी केली होती.