शुबमन गिलच्या प्रकृतीबाबत राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे अपडेट्स, सूर्यकुमारबद्दल मोठं विधान

ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघ ८ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहीमेला सुरुवात करणार आहे.

या लढतीपूर्वी भारताचा सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill) याला डेंग्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि तो या लढतीला मुकण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, आज राहुल द्रविडने गिलच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले.

सूर्यकुमार यादवबाबत बोलताना द्रविड म्हणाला की, सूर्यकुमार नेहमीच चांगला खेळाडू आहे आणि तो आपल्या देशातील खेळाच्या स्वरूपाशी जुळतो. त्याने दोन चांगले सामने खेळले. वन डे सामन्याच्या शेवटी आम्ही त्याला नेहमी सेटअपसाठी तयार करत असू. तो स्वतःहून अनेक वेगवेगळे मार्ग शोधत असतो. धावा काढण्याचे अनेक मार्गही तो शोधत आहे.

भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की , स्टार सलामीवीर शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातून अजूनही माघार घेतलेली नाही. कालच्यापेक्षा आज त्याला नक्कीच बरे वाटत आहे. वैद्यकीय चमू दररोज निरीक्षण करत आहे. आमच्याकडे ३६ तास आहेत, ते काय निर्णय घेतात ते आम्ही पाहू. आज त्याला नक्कीच बरे वाटत आहे.

तो पुढे म्हणाला, शुबमन गिल पहिल्या लढतीत खेळणार नाही, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. तो खेळू ही शकतो. वैद्यकीय टीमने अद्याप त्याला नाकारले नाही. आम्ही दररोज त्याच्यावर लक्ष ठेवू. परवा त्याला कसे वाटते ते आम्ही पाहू आणि त्यानंतर निर्णय घेऊ.

शुभमन गिल चेन्नईच्या चेपॉकमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळू शकला नाही, तर या सामन्यात टीम इंडियाचा दुसरा सलामीवीर कोण हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मासोबत त्याच्या जागी इशान किशन सलामी करू शकतो अशी चर्चा आहे. याशिवाय केएल राहुल देखील सलामी करायला उतरू शकतो असेही बोलले जात आहे.