यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांनी आज कसोटी संघातून पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणारा इशान हा तिसरा भारतीय यष्टिरक्षक ठरला. यापूर्वी १९७१ मध्ये पोचिह कृष्णमुर्थी ( किंगस्टन) आणि २००२ मध्ये अजय रात्रा ( पोर्ट ऑफ स्पेन) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते.
यशस्वी जैस्वाल देशांतर्गत क्रिकेटमध्ये ८०.२१ च्या मजबूत सरासरीसह टीम इंडियासाठी पदार्पण करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. जेव्हा सचिनने भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते, त्यावेळी त्याची स्थानिक क्रिकेटमध्ये सरासरी ७०.१८ होती. स्थानिक क्रिकेटमध्ये ८८.३७ च्या सरासरीने धावा केल्यानंतर विनोद कांबळी टीम इंडियाकडून खेळणारा पहिला आणि प्रवीण अमरे ( ८१.२३ची सरासरी ) दुसरे फलंदाज होते.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर असणारा युनिक विक्रम, आज विराटच्या नावावर नोंदवला गेला. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये वडील व मुलगा यांच्याविरुद्ध खेळणारा विराट हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने २०११ मध्ये शिवनाराण चंद्रपॉल व आज तागेनारायण चंद्रपॉलविरुद्ध कसोटी खेळतोय. सचिन तेंडुलकरने १९९२ मध्ये जॉफ मार्श आणि २०११-१२ मध्ये त्यांचा मुलगा शॉन मार्श यांच्याविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळले होते.
भारताकडून कसोटीत एकाच सामन्यात डावखुरे खेळाडू पदार्पण करण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी २०२१ मध्ये टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघातील बाप व मुलाला बाद करणारा आर अश्विन पाचवा गोलंदाज ठरला. आर अश्विनने विंडीजविरुद्धच्या सामन्यात शिवनारायण व तागेनारायण चंद्रपॉल या बाप-बेटा जोडीला बाद केले आहे. इंग्लंडच्या इयान बॉथम यांनी लान्स क्रेन्स व ख्रिस क्रेन्स, पाकिस्तानच्या वसीम अक्रम यांनी लान्स क्रेन्स व ख्रिस क्रेन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, द. आफ्रिकेच्या सिमॉन हार्मर यांनी शिवनारायण व तागेनारायण चंद्रपॉल यांची विकेट घेतली आहे.
आर अश्विनने विंडीजला सातवा धक्का देऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण केल्या. अनिल कुंबळे ( ९५६) आणि हरभजन सिंग ( ७११) यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला. त्यानंतर कपिल देव ( ६८७), झहीर खान ( ६१०) आणि जवागल श्रीनाथ ( ५५१) यांचा क्रमांक येतो. अश्विनने ३५१ इनिंग्जमध्ये हा टप्पा गाठून शेन वॉर्नचा ( ३५४) विक्रम मोडला. मुथय्या मुरलीधरन ( ३०८) अव्वल स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०००+ धावा आणि ७००+ विकेट्स घेणारा आर अश्विन हा पहिलाच भारतीय आणि एकूण सातवा खेळाडू ठरला. शॉन पोलॉक ( 7386 धावा / 829 विकेट्स), डॅनिएल व्हिटोरी ( 6989 धावा / 705 विकेट्स), वसीम अक्रम ( 6615 धावा/ 916 विकेट्स), चमिंडा वास (5147 धावा/ 761 विकेट्स), स्टुअर्ट ब्रॉड (4287 धावा/ 841 विकेट्स), शेन वॉर्न (4172 धावा/ 1001 विकेट्स) आणि आर अश्विन (4020 धावा/700 विकेट्स) हे ते महारथी आहेत.