आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये कालच्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्स संघाचा सलामीवर क्विंटन डी कॉक याचं जबरदस्त शतक पाहायला मिळालं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात लखौनं कोलकातावर २ धावांनी विजय प्राप्त केला.
लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं सामन्यात ७० चेंडूत नाबाद १४० धावा कुटल्या आणि संघाच्या विजयाचा तो शिल्पकार ठरला. सामनावीराच्या पुरस्कारानं त्याला गौरविण्यात आलं. ज्या क्षणी डी कॉकनं आपलं शतक साजरं केलं तो क्षण देखील त्याच्यासाठी खूप खास ठरला.
डी कॉकनं शतक पूर्ण केल्यानंतर त्याची पत्नी साशा देखील आपल्या चार महिन्यांच्या चिमुकली किआराला घेऊन उभी राहिली. तिनं अगदी 'बाहुबली' स्टाईलनं किआराला दोन्ही हातांनी उचललं आणि डॉ कॉकनं केलेल्या शतकाचं सेलिब्रेशन केलं.
द.आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या क्विंटन डी कॉक याला नुकतंच ७ फेब्रुवारी रोजी कन्यारत्न प्राप्त झालं होतं. त्यावेळी डी कॉकनं आपल्या चिमुकलीचा छानसा फोटो देखील चाहत्यांसाठी शेअर केला होता.
डी कॉकनं त्याच्या चिमुकलीचं नाव किआरा ठेवलं आहे. मुलीच्या जन्माच्या अवघ्या एक आठवड्याआधीच डी कॉकनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. भारत विरुद्ध द.आफ्रिकामध्ये खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत निवृत्तीची घोषणा केली होती.
डॉ कॉकया यंदाच्या आयपीएल लिलावात लखनौ सुपरजाएंट्स संघानं खरेदी केलं. लखनौच्या फ्रँचायझीनं डी कॉकसाठी ६.७५ कोटी रुपये खर्च केले. डॉ कॉकनं आतापर्यंत या सीझनमध्ये १४ सामने खेळले असून यात त्यानं ५०२ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोलकाता विरुद्धच्या कालच्या सामन्यात लखनौनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता तब्बल २१० धावा केल्या होत्या. डी कॉकसोबत सलामीला आलेल्या कर्णधार केएल राहुलनं सामन्यात ५१ चेंडूत ६८ धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तर कोलकाचा संघ ८ विकेट्सच्या मोबदल्यात २० षटकांच्या अखेरीस २०८ धावा करू शकला आणि लखनौनं २ धावांनी विजय साजरा केला.