Prithvi Shaw and Sapna Gill: "तर पृथ्वी शॉ एक्स्पोज होईल..."; क्रिकेटरशी वाद घालणाऱ्या सपना गिलने केला खळबळजनक दावा

एका व्हिडीओबाबत सध्या रंगलीय चर्चा, काय आहे त्या व्हिडीओमध्ये... जाणून घ्या

Prithvi Shaw and Sapna Gill: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ याची अलीकडेच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्स सपना गिल आणि तिच्या काही मित्रांसोबत भांडण झाले. यानंतर पृथ्वी शॉने सपना विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सपनाला अटकही केली.

आता हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आहे आणि आता या प्रकरणी पृथ्वी शॉ स्वत:च आणखी अडचणीत येऊ शकतो असे बोलले जात आहे.

सपना गिलच्या वकिलाने दावा केला आहे की त्यांच्याकडे असा एक व्हिडिओ आहे, ज्यामुळे पृथ्वी शॉची असभ्य वर्तणूक सर्वांसमोर येईल. वकिलाने दावा केला आहे की, हा व्हिडीओ सपनाकडे असून ती लवकरच तो व्हिडीओ कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

सपना गिलच्या वकिलाने सांगितले, "सपना गिलकडे असा एक व्हिडिओ आहे, जो ती आता देऊ इच्छित नाही. मी देखील तिला सांगितले आहे की आता हा व्हिडीओ मिडियामध्ये येऊ देऊ नकोस"

सपनाच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, "त्या व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ शोभितचा फोन खेचून फेकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच पृथ्वी शॉ ने आणखी जे काही केलंय तेदेखील यात दिसतंय. त्यामुळे तो व्हिडीओ जर बाहेर आला तर पृथ्वी शॉ चारचौघात एक्स्पोज होईल."

वकिलाने पुढे सांगितले, "जर सपनाला प्रसिद्धीची आवड असती तर तिने हा व्हिडिओ बाहेर शेअर केला असता. हा व्हिडीओ कोर्टात पुरावा म्हणून दाखवावा, असे मी आतापर्यंत १० वेळा सपनाला सांगितले आहे. पण एक वकील म्हणून सपनाने मलाही अजून तो व्हिडिओ दिलेला नाही. मी केवळ व्हिडिओमध्ये स्पष्टपणे काही गोष्टी पाहिल्या आहेत, ज्यामुळे पृथ्वी शॉची असभ्यता स्पष्टपणे समोर येईल."

"तुम्ही असादेखील विचार करा की, जर त्या पबमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले तर काय-काय गोष्टी उघड होतील. कारण तिथे तर त्यांच्या लोकांनी या लोकांना पकडून मारले आहे," असा खळबळजनक दावाही तिच्या वकिलांनी केली.

सपनाने आता तडजोड करण्यास साफ नकार दिली आहे. सपना गिल म्हणाली, "मी हे प्लॅनिंग करून केले नाही, पण आता या प्रकरणात मी मागे हटणार नाही. कारण मी हे सर्व सहन केले आहे."

"माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय झाले ते मला माहीत आहे. या घटनेने माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, त्यामुळे तडजोडीचा प्रश्नच उद्भवत नाही," असे सपना गिलने स्पष्टच सांगितल्यामुळे आता पृथ्वी शॉ च्या अडचणी किती प्रमाणात वाढणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.