एकेकाळी पाणीपुरी विकणाऱ्या पोराची 'यशस्वी' कामगिरी! युवा फलंदाजाने २०२२ वर्ष गाजवले

Performance of Jaiswal in 2022: भारताचा अ संघ युवा खेळाडूंची फौज घेऊन बांगलादेश दौऱ्यावर गेला आहे आणि यशस्वी जैस्वालने भारत अ संघाकडून पदार्पणाचा सामना गाजवला.

Performance of Jaiswal in 2022: भारताचा अ संघ युवा खेळाडूंची फौज घेऊन बांगलादेश दौऱ्यावर गेला आहे आणि यशस्वी जैस्वालने भारत अ संघाकडून पदार्पणाचा सामना गाजवला. एकेकाळी पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वीकडे टीम इंडियाचा भविष्याचा ओपनर म्हणून पाहिले जातेय.

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघाचा सुपरस्टार यशस्वीने २३ वर्षांखालील सी के नायूडू स्पर्धेत मुंबईच्या संघात दमदार कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यासाठी RRने २.४० कोटी मोजले होते.

यशस्वीच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याच्या यशाला मिळत असलेल्या लखलखाटामागे मनाला हेलावून टाकणारी दुसरी बाजू आहे. तीन वर्ष यशस्वी तंबूत राहिला, पाणीपुरी विकली... क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

मुंबईच्या आझाद मैदान येथील मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत यशस्वी तीन वर्ष राहिला. एका डेअरी शॉपमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे त्याला मालकानं कामावरून काढून टाकलं होतं.

फक्त एक यशस्वी क्रिकेटपटू बनायचंय हे एकच ध्येय उराशी बाळगून तो झटत राहिला. उत्तर प्रदेशातील भदोही गावातील हा युवा खेळाडू. त्याच्या वडिलांचं गावाकडं एक लहानस दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं मुंबई गाठली.

मुंबईत तो त्याच्या काकांकडे रहायचा, पण घर छोटं असल्यानं सर्वांना तेथे राहणे अवघड जायचे. त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली. त्यानंतर यशस्वी क्लबच्या तंबूत तीन वर्ष राहिला.

त्यानं हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही. त्यांना कळले असते तर यशस्वीची क्रिकेट कारकिर्द तेथेच संपुष्टात आली असती. त्याचे वडील मुंबईला पैसे पाठवायचे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे पाणीपूरी व फळ विक्री करायचा. अनेकदा तर त्याला रिकामी पोटी झोपावं लागलं आहे.

रणजी करंडक - ४९८ धावा ( सरासरी ८३), आयपीएल - २५८ धावा ( सरासरी १३३), दुलीप ट्रॉफी - ४९७ धावा ( सरासरी ९९.४ ), सय्यद मुश्ताक अली - २६६ धावा ( सरासरी १४१.४), विजय हजारे ट्रॉफी - ३९६ धावा ( सरासरी ७९.२) ,भारत अ पदार्पणात १४५ धावा