२८ वर्षे सलग १६ पराभव! पाकिस्तानचा लाजिरवाणा 'विक्रम', ऑस्ट्रेलियात शेजाऱ्यांची 'कसोटी'

pakistan vs australia test series: सध्या पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे.

ऑस्ट्रेलियाने २८ वर्षांची परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. सध्या पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील सलामीचे दोन्हीही सामने जिंकून यजमानांनी २-० ने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

सलामीच्या सामन्यात शेजाऱ्यांना तब्बल ३६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला.

या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ आणि दुसऱ्या डावात २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात २६४ आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या.

खरं तर पाकिस्तानला मागील २८ वर्षांमध्ये एकदाही ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने १० बळी घेतल्याने त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

मागील २८ वर्षांत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्व १६ सामने गमवावे लागले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे एकही सामना जिंकण्यात शेजाऱ्यांना यश आले नाही. पाकिस्तानवर सलग १६ सामने गमवायची नामुष्की ओढवली.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २०२३ हे वर्ष गाजवले. ऑस्ट्रेलियाने यंदा वन डे विश्वचषक, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, ॲशेस मालिका आणि घरच्या मैदानावर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची किमया साधली

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३१८ धावा केल्या होत्या. यजमान संघाकडून मार्नस लाबूशेनने १५५ चेंडूंचा सामना करत ६३ धावा केल्या. तर, सलामीवीर उस्मान ख्वाजाने ४२ आणि डेव्हिड वॉर्नरने ३८ धावांचे योगदान दिले. मिचेल मार्शने ४१ धावा केल्या. यादरम्यान पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना झमालने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर शाहीन आफ्रिदी, मीर हमजा आणि हसन अली यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले.

दरम्यान, पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही शेजाऱ्यांची अवस्था बिकट झाली. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद २६४ धावा केल्या होत्या. कर्णधार शान मसूदने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. बाबर आझम या डावात फ्लॉप ठरला. तो एक धाव करून बाद झाला.

तर, मोहम्मद रिझवानने ४२ धावांची आणि सौद शकीलने ६२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्सने ५ बळी घेतले. याशिवाय नॅथन लायनने चार बळी घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली.

मिचेल मार्शने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी केली. त्याने १३० चेंडूंचा सामना करत ९६ धावा कुटल्या. मार्शने या खेळीत १३ चौकार मारले. तर, ॲलेक्स कॅरी (५३) आणि स्टीव्ह स्मिथ (५०) धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि मीर हमजा यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले, तर जमालने २ बळी घेतले.