पाकिस्तानचं भारताच्या पावलावर पाऊल! महिलांसाठी PSL ची योजना; आफ्रिदीची हकालपट्टी

Pakistan Cricket Board: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ केवळ पाकिस्तानात होईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला असून ट्वेंटी-२० विश्वचषकात शेजाऱ्यांचा संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात दिसणार आहे. पीसीबी चर्चेच्या केंद्रस्थानी असून शेजाऱ्यांनी विश्वचषकाच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला इमाद वसीम पुन्हा एकदा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामात शानदार कामगिरी केल्यानंतर वसीमचे संघातील वजन वाढले. (Imad Wasim Latest News)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-२० संघाची धुरा शाहीन शाह आफ्रिदीकडे दिली आहे. पण त्याची या पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आगामी काळात जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. (Imad Wasim On T20 World Cup 2024)  

भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात शेजाऱ्यांनी निराशाजनक कामगिरी केली. अफगाणिस्तानसारख्या संघाकडून देखील पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता.

यानंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मग पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीला तर कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूदकडे सोपवले. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, जुनी निवड समिती बरखास्त करण्यात आली असून ७ सदस्यीय नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे.

शाहीन शाह आफ्रिदी भविष्यातही कर्णधार असेल याबाबत काहीही सांगता येत नाही. हारिस रौफला केंद्रीय करारात स्थान देण्यात आले आहे. नवीन प्रशिक्षक कोण असेल याबाबत ४-५ दिवसात स्पष्ट माहिती समोर येईल.

तसेच निवड समितीने मोहम्मद आमिरला परत घेण्याबद्दल हिरवा सिग्नल दिला तर तो पाकिस्तानसाठी खेळू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ केवळ पाकिस्तानात खेळवली जाईल यात शंका नाही.

हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा खेळवली जाणार नाही. महिलांची पाकिस्तान सुपर लीग खेळवण्याबाबत आम्ही विचार करत आहोत, असे मोहसिन नक्वी यांनी म्हटले.

आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा कर्णधार कोण असेल याबाबात निवड समिती निर्णय घेईल, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले.