PHOTOS : आशिया चषकात पाकिस्तानी गोलंदाजांची 'दहशत', भारतासह बांगलादेशलाही फोडला घाम

asia cup 2023 : आशिया चषक २०२३ मध्ये यजमान पाकिस्तानी संघाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

आशिया चषक २०२३ मध्ये यजमान पाकिस्तानी संघाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी संघाने सांघिक खेळी करत आपला विजयरथ कायम ठेवला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा दारूण पराभव करत शेजाऱ्यांनी सुपर ४ मध्ये देखील विजयाचे खाते उघडले.

सलामीच्या सामन्यात नेपाळला पराभवाची धूळ चारल्यानंतर यजमानांचा सामना बलाढ्य भारताशी झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला.

भारताविरूद्धचा सामना रद्द होताच पाकिस्तानने तीन गुणांसह सुपर ४ मध्ये प्रवेश केला. शेजाऱ्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यांत त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी कमाल केली.

हारिस रौफ, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या त्रिकुटाने भल्याभल्यांना चीतपट केले. लक्षणीय बाब म्हणजे या तिघांनी तीन सामन्यांत एकूण २३ बळी पटकावले आहेत.

भारताविरूद्ध देखील या त्रिकुटाने रोहितसेनेला घाम फोडला. त्या सामन्यात शाहीनने सर्वाधिक ४ तर नसीम आणि हारिस यांना प्रत्येकी ३-३ बळी घेण्यात यश आले.

आशिया चषकाच्या यंदाच्या पर्वात आतापर्यंत हारिस रौफने सर्वाधिक (९) गडी बाद केले आहेत. याशिवाय नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी यांनी ७-७ बळी घेतले आहेत.

त्यामुळे आशिया चषकात पाकिस्तानी गोलंदाजांची 'दहशत' आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. इशान किशन आणि हार्दिक पांड्या वगळता एकाही भारतीय फलंदाजाकडे पाकिस्तानी गोलंदाजांच्या या घातक गोलंदाजीला उत्तर नव्हते.

शाहीन आफ्रिदीने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा त्रिफळा काढून टीम इंडियाला मोठे धक्के दिले होते. याशिवाय त्याने लयमध्ये असलेल्या हार्दिक पांड्याला देखील बाहेरचा रस्ता दाखवला.

काल झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात देखील पाकिस्तानी गोलंदाजांनी आपला जलवा कायम ठेवला. बांगलादेशविरूद्ध हारिस रौफ (४), नसीम शाह (३) आणि शाहीन आफ्रिदीने (१) बळी घेतला. बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने देखील या त्रिकुटाला वर्ल्ड क्लास गोलंदाज म्हणत त्यांचे कौतुक केले.

आता १० सप्टेंबरला पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे आगामी सामन्यात भारतीय शिलेदार पाकिस्तानला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहण्याजोगे असेल.