क्रिकेट विश्वातील मागील काही दिवसांचा कालावधी म्हणजे पाकिस्तानी चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच... बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाने पहिल्याच कसोटी सामन्यात यजमानांचा दारुण पराभव केला.
फेब्रुवारी २०२१ मध्ये पाकिस्तान शेवटच्या वेळी आपल्या मायदेशात कसोटी सामना जिंकला होता. तेव्हापासून आजतागायत शेजाऱ्यांच्या खात्यात विजयाचा दुष्काळ आहे.
तसेच तब्बल १४७ वर्षांनंतर प्रथमच असा लाजिरवाणा पराभव स्वीकारणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला. खरे तर पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ५५६ धावा करुनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले हे विशेष.
इंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी पहिला सामना जिंकला. विशेष बाब म्हणजे आशियाच्या धरतीवर ५५० हून अधिक धावा करुनही पराभूत झालेला संघ म्हणून पाकिस्तानच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
याशिवाय पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद सलग सहा कसोटी सामने गमावणारा पहिला कर्णधार ठरला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून शान मसूद पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करत असून, त्याच्या नेतृत्वात एकदाही पाकिस्तान विजयी होऊ शकला नाही.
पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवत पाहुण्या इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. यजमान पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ५५६ धावा करुन देखील त्यांना एक डाव आणि ४७ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.
इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने त्रिशतक तर जो रुटने द्विशतकी खेळी केली. तब्बल १,३३१ दिवसांपासून पाकिस्तान एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
दरम्यान, शेवटच्या वेळी पाकिस्तानने आपल्या मायदेशात कसोटी सामना जिंकला होता तेव्हा जो रुटच्या नावावर कसोटीमध्ये १९ शतकांची नोंद होती. मात्र, तो आताच्या घडीला ३५ शतकांपर्यंत पोहोचला तरी पाकिस्तानच्या पराभवाची मालिका कायम आहे.