PHOTOS: ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी पाकिस्तानी संघ बनला 'सांताक्लॉज', PCBने शेअर केली झलक

पाकिस्तानी संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाने यजमान संघाच्या खेळाडूंना विशेष गिफ्ट देऊन नाताळचा सण साजरा केला. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघ ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले.

ऑस्ट्रेलियाने ३६० धावांनी मोठा विजय मिळवून विजयी सलामी दिली. आता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

आगामी दुसरा सामना हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. मात्र, याआधीच पाकिस्तानच्या संघाने असे काही केले, ज्याचे जगभरातून कौतुक होत आहे. नेटकऱ्यांसह चाहते पाकिस्तानी संघाचे कौतुक करत आहेत.

खरं तर शेजाऱ्यांनी ख्रिश्चन सण ख्रिसमसनिमित्त ऑस्ट्रेलियाचा संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटवस्तूंचे वाटप केले. आज सर्वत्र ख्रिश्चनांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस साजरा केला जात आहे.

जगभरात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाला लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. ख्रिसमसची झाडे घरी लावली जातात, स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. याच सणाच्या निमित्ताने पाकिस्तानी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटवस्तूंचे वाटप केले आहे, ज्याचे फोटो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केले आहेत.

पाकिस्तानचा नवनिर्वाचित कर्णधार शान मसूद मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इनडोअर नेटवर गेलाला, जिथे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि इतर खेळाडूंचे कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंनी कमिन्स आणि इतर खेळाडूंच्या कुटुंबीयांना भेटवस्तू दिल्या. कमिन्सच्या हातात गिफ्टची टोपलीही पाहायला मिळते.

पाकिस्तानी संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत शेजाऱ्यांना ही मालिका जिंकण्यासाठी आगामी दुसरा कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.

कांगारूंनी मेलबर्न येथील कसोटी सामना अनिर्णित केला तर यावेळी देखील पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकता येणार नाही.