बुमराहसह ३ खेळाडूंनी ऑक्टोबर गाजवला; ICCकडून कोणाला मिळणार भेट? २ फलंदाज शर्यतीत

ICC Player Of The Month : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने विश्वचषकातील ८ सामन्यांत ६८.७५ च्या सरासरीने ५५० धावा केल्या आहेत.

सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि न्यूझीलंडचा रचिन रवींद्र हे विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

या त्रिकुटाने अप्रतिम कामगिरी करताना आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. आता या तिन्ही खेळाडूंना ऑक्टोबरसाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने विश्वचषकातील ८ सामन्यांत ६८.७५ च्या सरासरीने ५५० धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आताच्या घडीला क्विंटन डी कॉक पहिल्या क्रमांकावर आहे.

यंदाच्या विश्वचषकाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा रचिन रवींद्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. रचिन रवींद्रने ८ सामन्यांत ५२३ धावा केल्या आहेत. याशिवाय जसप्रीत बुमराहने ८ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत.

या तिन्ही खेळाडूंना ऑक्टोबर महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले आहे. मात्र, ऑक्टोबरच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी कोणत्या खेळाडूची निवड होते हे पाहण्याजोगे असेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचला असून गुणतालिकेत यजमानांचा दबदबा आहे. भारताचे ८ सामन्यांत १६ गुण आहेत. रोहितसेनेने सलग आठ सामने जिंकले आहेत.

उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने ८ सामने खेळले आहेत, ज्यात ६ सामन्यांत विजय तर २ सामने त्यांना गमवावे लागले.

याशिवाय गतविजेते इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका हे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. तर, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे.