आता विराटची बॅट थंडावणार; टीम इंडियाची चिंता वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Virat Kohli : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे.

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने २०२३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहली हा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला असून, त्याने आतापर्यंत स्पर्धेतील ९ सामन्यात दोन शतकं आणि पाच अर्धशतकांसह ५९४ धावा कुटल्या आहेत. त्याच्या या खेळाच्या जोरावर भारतीय संघ साखळीतील एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

आता बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. ती म्हणजे विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांमधील विराट कोहलीची कामगिरी. गेल्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये विराट कोहली बाद फेरीच्या सामन्यांमध्ये फार लक्षवेधी कामगिरी करू शकलेला नाही. या सामन्यांमध्ये त्याची सरासरी ही भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे यावेळी तरी विराट आपला नकोसा रेकॉर्ड मोडणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

२०११ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्ये विराट कोहलीचा समावेश होता. त्या स्पर्धेत भारताने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. मात्र त्या सामन्यात विराट कोहलीला केवळ २४ धावाच काढता आल्या होत्या. तर पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने ९ धावा काढल्या होत्या. श्रीलंकेविरुद्ध रंगलेल्या अंतिम सामन्यात विराटने ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

२०१५ च्या विश्वचषकाचा विचार केल्यास विराट कोहलीला बांगलादेशविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात केवळ ३ धावा करता आल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट केवळ एक धाव काढून माघारी परतला होता.

तर २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यातही विराट कोहलीला चमक दाखवण्यात अपयश आले होते. त्या सामन्यात विराट केवळ एक धाव काढून बाद झाला होता. तसेच न्यूझीलंडकडून पराभूत होऊन भारतीय संघ स्पर्धेतून बाद झाला होता.

मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत ९ डावांमध्ये ९९ च्या सरासरीने ५९४ धावा काढल्या आहेत. त्यात २ शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तानविरुध १६ आणि इंग्लंडविरुद्ध ० वगळता प्रत्येक सामन्यात विराटने ५०+ धावा काढल्या आहेत.

मात्र चिंतेची बाब म्हणजे विराट कोहलीने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये ६ वेळा नॉकआऊट (बाद फेरी) सामने खेळले आहेत. त्यातील चार सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. तर दोन सामन्यात टीम इंडिया पराभूत झाली आहे. या सहा सामन्यांमध्ये विराट कोहलीला अवघ्या १२ च्या सरासरीने ७३ धावाच जमवता आल्या आहेत. त्यात ३५ ही विराटची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर स्टाइक रेट केवळ ५६ चा राहिला आहे. तर सहा सामन्यांत मिळून विराटला केवळ ५ चौकार मारता आले आहेत.

मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीचा रेकॉर्ड हा जबरदस्त आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंतच्या ३० डावांमध्ये ५७ च्या सरासरीने १५२८ धावा कुटल्या आहेत. त्यात ५ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान नाबाद १५४ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहेत. आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या उपांत्य सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.