Mumbai Indians Loss Zaheer Khan, IPL 2022: Rohit Sharma च्या नेतृत्वाखाली 'मुंबई इंडियन्स'च्या सततच्या पराभवावर जहीर खान म्हणतो, "प्रत्येक दिवस आपला नसतो, पण..."

मुंबईचा संघ गुणतालिकेत शून्य गुणांसह तळाशी

Mumbai Indians Loss Zaheer Khan, IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या संघाचा यंदाच्या हंगामात रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली सलग सहा सामन्यात पराभव झाला. सध्या MI गुणतालिकेत शून्य गुणांसह तळाशी आहे. त्यामुळे संघावर सातत्याने टीका होत आहे. तशातच, भारताचा माजी गोलंदाज आणि संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स जहीर खान याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

जहीर खान म्हणाला, "क्रिकेट हा एक सांघिक कौशल्याचा खेळ आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात आम्हाला एकमेकांना सहकार्य करणं जास्त गरजेचं आहे. जर आमचा संघ एकसंध होऊन कामगिरी करू शकला तर आम्ही एकत्रितपणे एक मोठं बळ निर्माण करू शकू. त्यामुळे संघाचेही मनोधैर्य वाढेल."

"प्रत्येक सीझनमध्ये आव्हाने वेगवेगळी असतात. प्रत्येक वेळी घडणारे बदल पाहता दडपण हे कायमच सर्वात जास्त असते. अशा परिस्थितीत आमच्या खेळाडूंना झुंजार वृत्ती आणि लढाऊपणा दाखवावा लागेल."

"क्रिकेटमध्ये जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला निराशाजनक सामन्यांचा विचार सोडून आगामी सामने आणि आव्हानांचा विचार करावा लागेल. त्यासंदर्भातील प्लॅनिंग करावे लागेल. क्रिकेट तुम्हालाच हेच शिकवते."

"डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा या नव्या खेळाडूंमध्ये चांगली भागीदारी होते असं दिसून आलं आहे. अशा टॅलेंटचाच सर्व टीम्स शोध घेत असतात. नवे खेळाडू येत आहेत, त्यांना पाठिंबा देणे हे आमचं काम आहे.

"प्रत्येक दिवस तुमचा नसतो. पण या वाक्याचा अर्थ प्रत्येक जण कसा घेतो यावर त्याची महती अवलंबून आहे. त्यातून तुम्ही काय शिकता, यावर सारं काही अवलंबून आहे", असे जहीर खान म्हणाला.