महेंद्रसिंग धोनीचे हे 3 स्टार खेळाडू 9 दिवसांत झाले निवृत्त, एका जिगरीचाही समावेश

भारतीय संघातील 3 माजी खेळाडूंनी मागील 9 दिवसांत निवृत्तीची घोषणा केली आहे. हे तिन्ही खेळाडू भारतीय संघाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे अत्यंत जवळचे सहकारी राहिले आहेत.

सप्टेंबरच्या महिन्यात भारतीय संघातील 3 माजी खेळाडूंनी क्रिकेटला रामराम केले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जवळचे सहकारी म्हणून यांची ओळख राहिली आहे. मागील 9 दिवसांत धोनीच्या तीन स्टार खेळाडूंनी एक-एक करून निवृत्ती जाहीर केली. यात धोनीचा अत्यंत जवळचा सहकारी सुरैश रैनाचा देखील समावेश आहे.

सर्वप्रथम सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. खरं तर रैनाने धोनीसोबतच 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. पण यावेळी त्याने उत्तर प्रदेश क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

सुरेश रैनाने 2 वर्षांपूर्वी राजीनामा घेतल्यानंतर तो इंडियन प्रीमियर लीग आणि उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएल 2022 च्या हंगामात रैनाला कोणत्याच फ्रँचायझीने खरेदी केले नव्हते.

रैनाच्या पाठोपाठ मध्यप्रदेशच्या संघाला पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकवून देणारा स्टार गोलंदाज ईश्वर पांडेने 12 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 33 वर्षीय ईश्वर पांडेची दोनवेळा न्यूझीलंड आणि इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्याला पदार्पणची संधी मिळू शकली नव्हती.

निवृत्तीनंतर वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, धोनीने जर त्याला संधी दिली असती तर आज त्याचे करिअर वेगळे असते. चेन्नई सुपर किंग्जसोबत ईश्वर पांडे दोन हंगाम जोडला होता. यादरम्यान त्याला धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचे मार्गदर्शन मिळाले होते.

रैना आणि पांडे पाठोपाठ धोनीच्या आणखी एका सहकाऱ्याने संन्यासाची घोषणा केली आहे. 14 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणाऱ्या रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. उथप्पा 2007 टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. त्याने 2015 मध्ये त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला होता.

36 वर्षीय रॉबिन उथप्पाने आयपीएलचे आतापर्यंतचे सर्व 15 हंगाम खेळले आहेत. आयपीएलमधील सहा संघाचा हिस्सा राहणाऱ्या उथप्पाने शानदार खेळीने सर्वांचे लक्ष वेधले होते. चेन्नई, कोलकाता, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये उथप्पा खेळला आहे. उथप्पाने आयपीएलमध्ये एकूण 205 सामने खेळले असून त्याने 4,952 धावा केल्या आहेत.