Rohit Sharma, Virat Kohliने २०२७चा वनडे वर्ल्डकप खेळावा का? MS Dhoni म्हणतो- त्यांचे वय...

MS Dhoni on Virat Kohli Rohit Sharma ODI World Cup 2027: विराट-रोहित या दोघांच्या वनडे विश्वचषकाच्या समावेशाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत

रोहित शर्मा आणि विराट कोहली ही भारतीय क्रिकेटमधील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली नावे आहेत. २०२७च्या वनडे विश्वचषकात भारतीय संघात या दोघांचा समावेश असावा की नसावा, यावर सध्या बरीच चर्चा रंगल्याचे दिसते.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकातील सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर आपले स्पष्ट आणि परखड मत मांडले आहे.

धोनी म्हणतो, "२०२७ चा विश्वचषक खेळायचा की नाही, याचा निर्णय सर्वस्वी रोहित आणि विराटनेच घ्यावा. त्यांच्यात अजूनही देशासाठी खेळण्याची जिद्द असेल आणि ते फॉर्ममध्ये असतील, तर त्यांना कोणीही थांबवू नये."

"जर वरिष्ठ खेळाडू धावा करत असतील आणि त्यांचा फिटनेस चांगला असेल, तर त्यांनी खेळत राहण्यास काहीच हरकत नाही. कामगिरी नसेल तर कोणालाही संघातून डच्चू दिला जाऊ शकतो, मग तो तरुण असो वा अनुभवी."

"एखादा खेळाडू अनफिट असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू देणे योग्य नाही. पण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दबावाखाली खेळण्यासाठी अनुभव लागतो, जो २०-२५ सामने खेळून येत नाही."

"कोणत्याही संघाला अनुभवी खेळाडू सहजासहजी मिळत नाहीत. जोपर्यंत एखादा खेळाडू स्वतःहून निवृत्तीचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत त्यांना वयाच्या मुद्द्यावरून त्याला संघातून वगळणे चुकीचे ठरेल असे माझे मत आहे."

"रोहित, विराट किंवा कुणाचेही वय हा माझ्यासाठी निवडीचा निकष नाही. कामगिरी आणि तंदुरुस्ती हे खरे निकष आहेत. जर एखादा खेळाडू ३५-३७ वर्षांचा असेल आणि तो फिट असेल, तर वयाने काहीच फरक पडत नाही."