IPL 2022 Retention : आयपीएल २०२२साठी जानेवारीत मेगा ऑक्शन होणार आहे आणि ८ फ्रँचायझींना संघात कोणते ४ खेळाडू कायम राखले जाणार आहेत, यासाठीची मुदत ३० नोव्हेंबरला संपत आहे. बीसीसीआयनं प्रत्येक फ्रँचायझींनी बजेट आखून दिलं आहे आणि त्यातच हे चार खेळाडू बसवायचे आहेत. त्यामुळे सर्व फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली आहे, परंतु महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचं ( Chennai Super Kings ) टेंशन हलक करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश झाल्यानं Mega Auction होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींसाठी काही नियम बनवले आहेत आणि त्यानुसार फ्रँचायझींना ४ खेळाडूंना कायम राखता येणार आहे. मग त्या चारपैकी ३ भारतीय की १ परदेशी, २ भारतीय की २ परदेशी हा त्या त्या संघांचा निर्णय असेल. BCCIनं त्यातही ट्विस्ट आणला आहे. बीसीसीआयनं या चार खेळाडूंसाठी प्रत्येक फ्रँचायझींना एक बजेट आखून दिलं आहे आणि त्यातूनच त्यांना खेळाडू निवडावे लागतील.
बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट दिला आहे. ही रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली जाईल. समजा एखाद्या फ्रँचायझीनं चार खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या पर्समधून ४२, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी वजा केले जातील. अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा होतील.
चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा घातली गेली आहे. तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठई ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा असेल. दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असेल. एकच खेळाडू रिटेन केल्यास तो १४ कोटींच्या आतच करावा लागेल.
महेंद्रसिंग धोनी हा CSKसोबत तीन वर्ष कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पण, धोनीला रिटेशन लिस्टमध्ये टॉपवर राहायचे नाही. आपल्यापेक्षा अन्य खेळाडूला अधिक रक्कम देऊन रिटेन करावे अशी त्याची इच्छा असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याच्याएवजी संघ व्यवस्थापनानं इतर खेळाडूला अधिकची रक्कम देऊन संघात कायम राखावे, असं त्यानं फ्रँचायझीला कळवले आहे.
CSK अष्टपैलू रवींद्र जडेजा व सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना संघात कायम राखण्याच्या तयारीत आहे. परदेशी खेळाडूंमध्ये मोईन अली, सॅम कुरन, जोश हेझलवूड व फॅफ ड्यू प्लेसिस हे पर्याय आहेत. धोनीच्या निर्णयाचा यापैकी कोणाला आर्थिक फायदा होतो, हे ३० नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.