१५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या या 'कॅप्टन कूल'ला दरमहा किती पेन्शन देते? याची तुम्हाला माहिती आहे का?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या माजी खेळाडूंच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पेन्शन योजना राबवते. २०२२ मध्ये या योजनेत मोठी सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे पेन्शनच्या रकमेत वाढ झाली आहे.
२५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन मिळते. तर, माजी कसोटी क्रिकेटपटूला दरमहा ६० हजार रुपये, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दरमहा ३० हजार रुपये आणि महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटुला दरमहा ५२ हजार ५०० रुपये पेन्शन दिली जाते.
एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने, ३५० एकदिवसीय सामने आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. नियमांनुसार, ज्या खेळाडूंनी २५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत, त्यांना सर्वोच्च पेन्शन मिळते. या निकषानुसार, बीसीसीआय धोनीला दरमहा ७०,००० रुपये पेन्शन देते.
धोनीची एकूण संपत्ती अंदाजे १,००० कोटी रुपयांच्या घरात आहे. आयपीएल २०२५ मध्येही तो चेन्नई सुपर किंग्जकडून 'अनकॅप्ड' खेळाडू म्हणून खेळला, ज्यासाठी त्याला ४ कोटी रुपयांचा करार मिळाला आहे. तरीही, क्रिकेटमधील योगदानाबद्दल मिळणारा हा पेन्शनचा निधी खेळाडूंच्या सन्मानाचे प्रतीक मानला जातो.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १७,२६६ धावा केल्या, ज्यामध्ये १६ शतके आणि १०८ अर्धशतके आहेत. त्याने कसोटीत ४,८७६ धावा, एकदिवसीय सामन्यात १०,७७३ धावा आणि टी-२० मध्ये १,६१७ धावा केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा प्रमुख स्पर्धा जिंकल्या.