मिताली राज-सचिन तेंडुलकर यांच्यातील खास कनेक्शनची गोष्ट; तो 'क्रिकेटचा देव' झाला अन् ती...

इथं जाणून घेऊयात मिताली राजसंदर्भातील काही खास गोष्ट

भारतीय महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी मिताली राज ३ डिसेंबरला आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या चाळीशीनंतरही ती सिंगल असण्यामागचं कारण तिचं पहिलं प्रेम असलेले क्रिकेट हेच आहे.

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरनं १९८९ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कराची कसोटीतून आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी सचिनचं वय हे १६ वर्ष आणि २०५ दिवस एवढे होते. तेंडुलकरच्या पदार्पणानंतर जवळपास १० वर्षांनी म्हणजे १९९९ मध्ये मिताली राज हिने आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी तिचे वय देखील १६ वर्षे आणि २०५ दिवस एवढे होते.

मिताली राज हिने आपल्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली होती. या खेळीसह तिने सर्वात कमी वयात पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळीचा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. २० वर्षांनी आयर्लंडच्या ए. हंटर हिने वयाच्या १६ व्या वर्षी सेंच्युरी ठोकत हा विक्रम मोडला होता.

मिताली राजच्या नावे कसोटीत सर्वात कमी वयात द्विशतक झळकवण्याचाही वर्ल्ड रेकॉर्ड आहे. २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात तिने २१४ धावांची खेळी केली होती. त्यावेळी मितालीचं वय १९ वर्षे आणि २५४ दिवस इतके होते. आजही तिचा हा विक्रम अबाधित आहे.

मिताली राजनं १९९९ ते २०२२ या मोठ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २३२ सामन्यात ५०.६८ च्या सरासरीसह ७८०५ धावा केल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत तिच्या जवळपासही कोणी दिसत नाही.

मिताली राजनं आपल्या कारकिर्दीत अनेक खास रेकॉर्ड केले आहेत. वनडेत कर्णधाराच्या रुपात तिने सर्वाधिक १५५ सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे.

मिताली राजचे करिअर २२ वर्षे आणि २४२ दिवस एवढे प्रदिर्घ राहिले. महिला क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा रेकॉर्डही तिच्या नावे आहे.

मितालीनं कसोटी केलेल्या २१४ धावा या चौथ्या क्रमांकावर कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीतील एका डावात सर्वाधिक ३ कॅचेससह वनडे क्रिकेटमध्ये सलग ७ अर्धशतकांचा रेकॉर्डही मितालीच्या नावे आहे.

भारतीय संघाला दोन वेळा महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये नेणारी मिताली राज आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर कॉमेंटेटर आणि फ्रँचायझी संघाच्या मार्गदर्शकाच्या रुपात आजही क्रिकेटशी कनेक्टेट आहे.