Tension! वर्ल्ड कपमध्ये भारताची वाढणार डोकेदुखी, समोर आलीय 'लाजीरवाणी' आकडेवारी

वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी करत असलेल्या भारतीय संघाची एक लाजीरवाणी आकडेवारी समोर आली आहे आणि त्याने चाहत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय संघ आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल व जसप्रीत बुमराह हेही दुखापतीतून पुर्णपणे तंदुरूस्त होऊन मैदानावर परतले आहेत. त्यामुळे आता भारतीय चाहते आतुरतेने वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होतेय. पण, त्याआधी भारतीय संघाची सर्वात कमकुवत बाजू समोर आली आहे आणि त्यामुळे टेंशन वाढले आहे.

नेपाळविरुद्धच्या आजच्या सामन्यात भारतीयांकडून वारंवार त्याच चुका झाल्या अन् त्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीने सर्वांना धक्का बसला. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ एका गोष्टीत सातत्याने अपयशी ठरतोय आणि अफगाणिस्ताननंतर त्यांचा शेवटून दुसरा क्रमांक लागतोय. इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड हे संघ आघाडीवर आहेत.

नेपाळविरुद्धच्या सामन्यात पहिल्या पाच षटकांत भारतीयांकडून ३ झेल सुटले. मोहम्मद शमीच्या सहाव्या चेंडूवर नेपाळचा सलामीवीर कुशल भुर्तेलचा सोपा झेल श्रेयसने स्लीपमध्ये टाकला. त्यानंतर दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर आसिफ शेखने शॉर्ट कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू विराटला सहज टिपता आला असता, परंतु त्याच्याकडून झेल सुटल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक इशानकडून चूक झाली. शमीने टाकलेला चेंडूवर पुल शॉट मारण्याचा कुशलने प्रयत्न केला, परंतु तो त्याच्या बॅटला लागून डाव्या बाजूने इशानच्या दिशेने गेला. पण, इशानला तो झेल टिपला आला नाही अन् नेपाळला चौकार मिळाला. क्षेत्ररक्षकांचा हा खेळ पाहून रोहितचा पारा चढलेला.

त्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीने सर्वांची चिंता वाढलीय. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय खेळाडूंची झेल घेण्याची अॅक्युरसी ७५.१ टक्के इतकी आहे. गणिती भाषेत सांगायचे झाल्यास १०० पैकी २५ झेल भारतीय संघाने टाकले आहे. अफगाणिस्तान ७१.२ टक्क्यांसह दहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंड व पाकिस्तान टॉप टू मध्ये आहेत.