'मी प्रशिक्षक होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले'; रवी शास्त्रींचा खळबळजनक दावा

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले की, काही लोकांना मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून नको होतो.

नवी दिल्ली: मागील काही दिवसात भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल करण्यात आले. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याआधी रवी शास्त्रींना 2021च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियापासून वेगळे केले होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रींचा पहिला कार्यकाळ 2017 मध्ये सुरू झाला, त्यानंतर 2019 मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती झाली.

त्यांच्या जागी आता राहुल द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. शास्त्री आणि कोहली ही जोडी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकली, पण एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकली नाही. आपल्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाची आठवण करून देताना शास्त्रींनी एक खळबळजनक दावा केला आहे. काही लोकांना मी भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नको होतो, असा दावा त्यांनी केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले, माझ्या दुसर्‍या कार्यकाळात मी एका मोठ्या वादात अडकलो होतो, त्यानंतर अनेकांना मी प्रशिक्षक म्हणून नको होतो. त्यांच्या वागणुकीवरुन मला ते स्पष्ट दिसतं होतं. त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीला निवडलेही होते, पण 9 महिन्यांनंतर ज्या माणसाला बाहेर फेकले, त्याच माणसाकडे ते परत आले. हे तेच लोक होते, ज्यांना माझ्यासह भरत अरुण कोचिंग स्टाफमध्ये नको होते.

शास्त्री पुढे म्हणाले, होय, त्यांना मी आणि भरत अरुणला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून द्यावं असंही वाटत नव्हतं. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा परिस्थिती कशी बदलली आहे हे जाणवतं. मी लोकांकडे बोट दाखवत नाही, पण काही खास लोक होते, ज्यांनी मला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक न होण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. दरम्यान, रवी शास्त्रींनी त्या व्यक्तींचे नावे सांगितली नाहीत.

रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला एकाच भूमीवर दोनदा कसोटी मालिकेत पराभूत करण्यात यश मिळवले आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. मायदेशात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ अजिंक्य राहिला. त्यांच्या कार्यकाळात भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका जिंकल्या. गेल्या चार वर्षांत भारताची बेंच-स्ट्रेंथही अनेक पटींनी वाढली आहे

शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने एकूण 43 कसोटी सामने खेळले, त्यात 25 जिंकले आणि 13 गमावले आणि 5 सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने 79 सामने खेळले ज्यात 53 जिंकले आणि 23 हरले. दोन सामने बरोबरीत तर एक अनिर्णित राहिला. T20 मध्ये 68 सामने खेळल्यानंतर भारताने 44 जिंकले तर 20 मध्ये पराभव झाला. दोन सामने बरोबरीत तर दोन अनिर्णित राहिले.

Read in English