Ramiz Raja: "घरच्या मैदानावर कसं जिंकायचं ते भारताकडून शिका", रमीझ राझा यांचा पाकिस्तानला घरचा आहेर

IND vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे.

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

21 जानेवारी रोजी रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यझ रमीझ राजा यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच घरच्या मैदानावर कसे जिंकायचे हे भारताकडून शिकायला हवे असेही राजा यांनी म्हटले.

घरच्या मैदानावर कसे वर्चस्व गाजवायचे हे पाकिस्तानी संघाने भारताकडून शिकले पाहिजे. 2019 विश्वचषकापासून घरच्या मैदानावर 19 पैकी 15 वन डे सामने जिंकल्याबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ब्लू इन ब्लूचे कौतुक केले.

रोहित शर्मा अँड कंपनीने न्यूझीलंडचा दुसऱ्या वन डे सामन्यात आठ गडी राखून पराभव करून किवीविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. याबाबत बोलताना रमीझ राजा यांनी पाकिस्तानी संघाचे कान टोचले.

भारतीय संघाने 2023 च्या विश्वचषकाच्या आधी घरच्या मैदानावर बलाढ्य संघाना पराभवाची धूळ चारली आहे. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंडला पराभूत करून भारताने विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने पाऊले टाकली आहेत.

शनिवारी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना रमीझ राजा यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "भारताला भारतात हरवणे कठीण आहे. पाकिस्तानसह इतर संघांसाठी ही शिकण्यासारखी गोष्ट आहे", अशा शब्दांत त्यांनी रोहितसेनेचे कौतुक केले.

पाकिस्तानी संघाचे कान टोचताना त्यांनी म्हटले, "पाकिस्तानी संघाकडे पुरेशी क्षमता आहे, मात्र, निकाल किंवा मालिका विजयाच्या बाबतीत घरची कामगिरी टीम इंडियाइतकी सातत्यपूर्ण नाही. विश्वचषक स्पर्धेतील भारतासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे."

खरं तर पाकिस्तानी संघाला अलीकडेच मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला. तसेच पाकिस्तानला अलीकडेच इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांपैकी एकही कसोटी जिंकता आली नाही.

रमीझ राजा यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार कामगिरीबद्दल भारतीय वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले. आपल्या गोलंदाजांसाठी योग्य फील्ड सेटअप प्रदान केल्याबद्दल त्यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्माचे देखील कौतुक केले.

न्यूझीलंडच्या संघाचे कौतुक करताना राजा यांनी म्हटले, "न्यूझीलंड हा कमजोर संघ नाही. ते अव्वल क्रमांकावर आहेत. फलंदाजीत आत्मविश्वास, विश्वासार्हता आणि लय नसल्याने त्यांचा पराभव झाला."

भारतीय वेगवान गोलंदाजांचा वेग जास्त नसेल, पण गुणवत्ता होती. त्यांना काही विशिष्ट भागात गोलंदाजी करण्याची सवय लागली आहे. फील्ड ॲडजस्टमेंट सीम पोझिशनिंगनुसार होते. फिरकीही आली आणि चांगली गोलंदाजी केली. अशा शब्दांत राजा यांनी भारतीय गोलंदाजांचे विशेष कौतुक केले.

न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकात 108 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग आठ गडी आणि 29.5 षटके राखून केला.