भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव याने आपली बालपणापासूनची मैत्रीण वंशिका चड्ढा हिच्याशी विवाह करत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
उत्तराखंडमधील सुंदर मसूरी येथे शनिवारी खासगी पण सेलिब्रिटींच्या उपस्थितीत अगदी शाही थाटात कुलदीप-वंशिका जोडी विवाह बंधनात अडकली.
लग्नानंतर कुलदीपने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर करत आपल्या पत्नीवर प्रेमाची बरसात केली आहे.
लग्नाच्या तारखेचा उल्लेख करत Our Forever begins now या खास कॅप्शनसह कुलदीप यादवनं पत्नीसोबतचे लग्नाचे खास फोटो शेअर करत नव्या आयुष्याची सुरुवात केल्याची गोष्ट शेअर केली आहे.
लग्न समारंभातील दोघांची खास झलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. नवदांपत्य हातात हात घालून चालत असताना पार्श्वभूमीला फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचे व्हिडिओही विशेष चर्चेत राहिले.
कुलदीप यादव आणि वंशिका गतवर्षी नोव्हेंबरमध्येच लग्नबंधनात अडकणार होते. पण आयसीसी टी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता क्रिकेटरच्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता.
सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होताच कुलदीपनं IPL मध्ये व्यस्त होण्याआधी लग्नाचा मुहूर्त काढला.
कानपूरचे असलेले कुलदीप आणि वंशिका हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत असून, गेल्या वर्षी लखनऊमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता.
वंशिका सध्या LIC मध्ये कार्यरत आहे. लग्नाआधी हल्दी आणि संगीत यांसारखे पारंपरिक कार्यक्रम कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील मित्रमंडळींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.